भारताचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने रणजी करंडक स्पर्धेमध्ये मुंबईकडून खेळताना आज ३७९ धावांची खेळी करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. या खेळीबरोबरच तो प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. आसामविरुद्धच्या या सामन्यात पृथ्वी शॉ काल २४० धावांवर नाबाद होता. त्यानंतर आज त्याने अजून १३९ धावांची भर घालत त्रिशतकी खेळी केली. मात्र पृथ्वी शॉने केलेली ही रेकॉर्डब्रेक खेळी पाहण्याचं भाग्य मैदानात उपस्थित असलेल्या मोजक्या क्रिकेटप्रेमींशिवाय कुणालाही लाभलं नाही.
भारतीय संघात पुन्हा एकदा स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या पृथ्वी शॉने आपल्या फलंदाजीचा उच्च दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. त्याने ३८३ चेंडूत ३७९ धावा कुटल्या. क्रिकेट वर्तुळात या खेळीची चर्चा झाली मात्र सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी आणि प्रेक्षक या ऐतिहासिक खेळीचे साक्षीदार होऊ शकले नाहीत. पृथ्वी शॉ रेकॉर्डब्रेक खेळीकडे आगेकूच करतोय, याचे ठरावीक अपडेट मिळत होते. तसेच बीसीसीआयच्या वेबसाईटवरूनही बऱ्याच वेळाने या खेळीचा धावफलक दिसत होता. मात्र आता एवढी मोठी ऐतिहासिक खेळी होऊनही क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि क्रिकेटला धर्म मानले जाते अशा देशातील क्रिकेटप्रेमींना ही खेळी का पाहता आली नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच आयपीएलचे पाच वर्षांचे प्रसारण हक्क तब्बल ४८ हजार कोटी रुपयांना विकले होते. तसेच देशात होणाऱ्या क्रिकेट मालिकांचे अधिकार ६ हजार कोटींना विकले आहेत. मात्र असं असूनही देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि सर्वात मानाच्या असलेल्या रणजी करंडक स्पर्धेतील सर्व सामन्यांचे थेट प्रसारण करणे बीसीसीआयला शक्य झालेले नाही. त्यामुळे पृथ्वी शॉची ही ऐतिहासिक खेळी क्रिकेटप्रेमींनी पाहता आली नाही.
सध्या बीसीसीआय पंजाब विरुद्ध जम्मू-काश्मीर, बंगाल विरुद्ध बडोदा आणि मध्य प्रदेश विरुद्ध गुजरात या तीन सामन्यांचेच थेट प्रसारण करत आहे. तर मुंबई आणि आसाम यांच्यात सुरू असलेल्या सामन्याचं थेट प्रसारण करण्यात आलं नाही. त्यामुळे क्रिकेटप्रेमी एक ऐतिहासिक खेळी पाहण्यापासून वंचित राहिले.