हैदराबाद, आयपीएल 2019 : मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात जेतेपदाचा सामना सुरू झाला आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. आयपीएलनं सर्व खेळाडूंचं भलं केलं आहे आणि यंदाच्या आयपीएलमधूनही हेच पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विजेता संघ केवळ जेतेपदाचा चषकच नव्हे तर कोट्यवधी रुपयेही घेऊन जाणार आहे. विजेत्या आणि उपविजेत्यासह बरेच खेळाडूही आज मालामाल होणार आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये एकूण 50 कोटी रुपयांचे बक्षीत देण्यात येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोण किती पैसे जिंकणार...
एकूण 50 कोटी रुपयांमधील 50 टक्के रक्कम ही संघांना देण्यात येईल, तर उर्वरित 50 टक्के खेळाडूंमध्ये वाटण्यात येणार आहे. विजेता संघ जेतेपदाच्या चषकासह 25 कोटी, तर उपविजेता संघ 12.5 कोटी रुपये घेऊन जाणार आहे. याशिवाय तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर राहिलेले दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबाद अनुक्रमे 10.5 व 8.5 कोटी रुपये घेऊन जातील.
स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच ऑरेंज कॅपचा दावेदाराला 10 लाख रुपये मिळणार आहेत. सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरला ही कॅप मिळणार आहे. त्याने 12 सामन्यांत 692 धावा केल्या आहेत आणि त्याच्या आसपासही कोणी नाही.
सर्वोत्तम गोलंदाज म्हणजेत पर्पल कॅपचा दावेदारही 10 लाख घेऊन जाणार आहे. या दावेदारात दिल्ली कॅपिटल्सच्या कागिसो रबाडाने 12 सामन्यांत 25 विकेट्स घेतल्या आहेत, परंतु चेन्नई सुपर किंग्सचा इम्रान ताहीर 24 विकेट्ससह शर्यतीत आहे. आजच्या सामन्यात त्याने विकेट घेतल्यास तो पर्पल कॅपचा दावेदार ठरू शकतो.
मोस्ट व्हॅल्यूएबल खेळाडूही 10 लाखांचे बक्षीत घेऊन जाईल. त्याशिवाय प्रायोजकांकडून हंगामातील सर्वोत्तम कॅच पकडणाऱ्या खेळाडूला 10 लाख रुपये देण्यात येणार आहेत. सर्वोत्तम स्ट्राईक रेट असणाऱ्या खेळाडूला चषक आणि चारचाकी मिळणार आहे. स्टायलिश प्लेअर ऑफ सीजनच्या पुरस्कारासाठी 10 लाखांचे रोख रक्कम ठेवण्यात आले आहे. शिवाय गेम चेंजरलाही 10 लाख देण्यात येणार आहेत.