Join us  

प्रेक्षकांना एकदिवसीय, टी२० क्रिकेटचं पाहायचं आहे - मिताली राज

क्रिकेटपटू या नात्याने मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे, मात्र महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यांना प्राधान्य द्यावे लागेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 9:13 PM

Open in App

रोहित नाईक, मुंबई : ‘क्रिकेटपटू या नात्याने मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे, मात्र महिला क्रिकेटचा प्रसार करायचा असेल, तर एकदिवसीय आणि टी२० सामन्यांना प्राधान्य द्यावे लागेल. कारण प्रेक्षकांना हेच पाहायचे आहे,’ असे स्पष्ट मत भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.मुंबईमध्ये २४ नोव्हेंबरला वॉकेथॉन स्पर्धेचे दुसरे सत्र पार पडणार असून गुरुवारी या स्पर्धेची मितालीच्या उपस्थितीमध्ये घोषणा करण्यात आली. या वेळी मितालीने ‘लोकमत’शी संवाद साधला. यंदा जुलै महिन्यात इंग्लंड-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान एकमेव आंतरराष्ट्रीय महिला कसोटी सामना रंगला जो अनिर्णीत राहिला. याशिवाय भारतीय महिलांनी नोव्हेंबर २०१४ साली आपला अखेरचा कसोटी सामना घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. यामध्ये भारताने एक डाव व ३४ धावांनी बाजी मारली होती. एकदिवसीय व टी२० क्रिकेटच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला क्रिकेट फार कमी खेळले जाते.यामागचे कारण विचारले असता मिताली म्हणाली, ‘तुम्ही क्रिकेटकडे कशा प्रकारे पाहता यावर कसोटी सामने खेळवावे की नाही हे अवलंबून आहे. महिला क्रिकेटची प्रगती करायची असेल, तर तुम्ही नक्कीच एकदिवसीय व टी२० सामन्यांवर अधिक भर द्याल. कारण लोकांना तेच पाहायचे आहे. खेळाडू या नात्याने मला नक्कीच कसोटी खेळायचे आहे. कारण, कसोटी सामन्यातील प्रत्येक विभागात आव्हान असते. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. मानसिक, शारीरिक किंवा तंत्र अशा सर्व गोष्टींची कसून परीक्षा होते. एक खेळाडू म्हणून नक्कीच मला कसोटी क्रिकेट खेळायला आवडेल. पण खेळाचा प्रसार करायचा असेल तर एकदिवसीय किंवा टी२० सामन्यांना प्राधान्य देईन. कारण प्रेक्षकांना हेच आवडत आहे.’काही दिवसांपूर्वीच मितालीने टी२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र अजूनही ती बरेच टी२० सामने खेळू शकली असती, असे मत चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केले. यावर मिताली म्हणाली, ‘जे निर्णय मी घेतले आहेत, त्यावर अधिक चर्चा करण्यात मला रस नाही; शिवाय त्याविषयी मला आणखी कोणताही विचार करायचा नाही. आता माझे लक्ष्य २०२१ विश्वचषक स्पर्धा आहे आणि त्यावरच पूर्ण लक्ष केंद्रित आहे.’मिताली म्हणाली की, "अनेख नवोदित खेळाडू माझा आदर्श घेतात आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. जर लोक तुमचा आदर्श घेत असतील, तर तुम्हाला आपोआप प्रोत्साहन मिळते. अधिकाधिक मुलींना मी क्रिकेट खेळण्यासाठी आवाहन करेन. याआधीच्या काळात नक्कीच मुलींच्या क्रिकेटकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नव्हते; पण आज हे चित्र बदलले आहे."

टॅग्स :मिताली राजभारतीय महिला क्रिकेट संघ