भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच पाहुण्यांना मोठा धक्का बसला. त्यांचा प्रमुख खेळाडू अन् आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या शकिब अल हसनला दोन वर्ष क्रिकेटपासून दूर रहावे लागणार आहे. बांगलादेश क्रिकेटसाठी हा सर्वात मोठा धक्काच म्हणावा लागेल. मॅच फिक्सिंगसाठी बुकीनं संपर्क साधल्याची माहिती शकिबनं आयसीसीच्या लाचलुचपत विभागाकडून लपवली आणि त्यामुळेच त्याच्यावर बंदीची कारवाई झाली.
निलंबनाच्या कारवाईनंतर शकिब म्हणाला,''ज्या खेळावर मी मनापासून प्रेम केलं, त्यापासून दोन वर्ष दूर रहावे लागणार असल्यानं खुप निराश आहे, परंतु मी माझी चूक मान्य करतो.'' शाकिबला मॅच फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. ही माहिती शाकिबनं आयसीसीपासून लपवली, त्यामुळं त्याच्यावर ही बंदीची कारवाई झाली. शकिबनं हे आरोप मान्य केले. त्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या या बंदीचा काळ 2018 पासून सुरू होणार असल्यानं तो 29 ऑक्टोबर 2020मध्ये पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करू शकतो.
त्याच्यावरील कारवाईनंतर ढाका येथे 700 समर्थक रस्त्यावर उतरले आणि जोरदार घोषणा केल्या. शेकडो समर्थक बुधवारी रस्तावर उतरले आणि त्यांनी आयसीसीला हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार शकिबच्या मगुरा शहरात 700 लोकं घोषणाबाजी करत होते.
शकिब अल हसनवरील कारवाईनं बांगलादेशचा खेळाडू भावूक; सोशल मीडियावर झाला व्यक्तशकिबवरील कारवाईनंतर संघसहकारी मुशफिकर रहिमनं भावूक झाला आणि सोशल मीडियावरून त्यानं भावनिक मॅसेज पोस्ट केला. शकिबच्या अनुपस्थितीत ट्वेंटी-20 संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी महमुदुल्लाहकडे आणि कसोटी संघाची जबाबदारी मोमिनुल हककडे सोपवण्यात आली आहे. शकिबच्या अनुपस्थितीबाबत रहिमनं पोस्ट केली की,''18 वर्ष आम्ही एकत्र क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे तुझ्याशिवाय खेळण्याचा विचारही वेदनादायी आहे. तू विजेत्यासारखा कमबॅक करशील अशी आशा आहे. तुला माझा नेहमी पाठिंबा असेल. आत्मविश्वास खचू देऊ नकोस.''