- अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
भारताने विंडीजविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने तीन दिवसांत जिंकून दोन सामन्यांची कसोटी मालिका निर्विवादपणे जिंकली. घरच्या मैदानावर भारतीय संघ कायमच मजबूत दिसला आहे. फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक सर्वच चांगल्या फॉर्ममध्ये असतात. याआधी इंग्लंडमध्ये भारताने चार सामन्यांची मालिका गमावली होती, पण घरच्या मैदानावर खेळताना भारताचा मजबूत खेळ पाहण्यास मिळाला. वेस्ट इंडिजचा संघ पाच दिवसांच्या क्रिकेटमध्ये कमजोर आहे. भारताने विंडीजविरुद्धची मालिका जिंकली यात माझ्यासाठी विशेष असे काही नव्हते. पण दोन्ही सामने भारताने तीन दिवसांच्या आत जिंकले हे माझ्यासाठी खूप विशेष ठरले. यावरूनच ही मालिका किती एकतर्फी झाली हे दिसून येते. दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिज काही प्रमाणात टक्कर देईल, अशी अपेक्षा होती. पण असे काही झाले नाही. रोस्टन चेज, जेसन होल्डर यांच्या शानदार कमागिरीनंतरही विंडीज संघाकडून विशेष खेळ पाहण्यास मिळाला नाही. एकूणच या मालिकेत स्पर्धा किंवा कडवी झुंज पाहण्यास मिळालीच नाही.
असे असले तरी या मालिकेतून भारताला काही महत्त्वाचे फायदेही झाले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पृथ्वी शॉचे आगमन. पहिल्या सामन्यात शतक, दुसºया सामन्यातील पहिल्या डावात अर्धशतक आणि दुसºया डावात नाबाद खेळी.. त्याने पूर्ण मालिकेत २५०च्या आसपास धावा केल्या आणि मालिकावीरही ठरला. त्याने ज्या प्रकारे धावा केल्या, त्यावरून तो भविष्यातील मोठा स्टार खेळाडू ठरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता त्याची तुलना सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि ब्रायन लारा यांच्याशी होत आहे. पण माझ्या मते त्याची तुलना करायला नको. पृथ्वी शॉला पृथ्वी शॉ बनूनच पुढे यावे लागणार आहे. त्याला सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल. इतिहासावर नजर टाकल्यास एक गोष्ट कळून येईल की, आॅस्टेÑलियाच्या इतिहासामध्ये अनेक खेळाडू ‘दुसरा ब्रॅडमन’ म्हणून जन्माला आले, पण हेच खेळाडू भविष्यात फारवेळ टिकू शकले नाहीत. त्यामुळे पृथ्वीने केवळ स्वत:चा खेळ करावा हाच त्याच्यासाठी एक सल्ला आहे.
दुसरा युवा खेळाडू म्हणजे रिषभ पंत. दोन डाव तो खेळला आणि दोन्ही वेळा तो ‘नर्व्हस नाइंटी’चा शिकार ठरला. पण तो कधीही मला नर्व्हस दिसला नाही. शिवाय इंग्लंडमध्ये त्याच्याकडून सुमार यष्टीरक्षण झाले होते, पण येथे मात्र त्याने आपली कामगिरी उंचावली. तसेच लोकेश राहुलकडून जी अपेक्षा होती, ती पूर्ण झाली नाही. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणेही बºयापैकी खेळले. त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. सर्वांत जास्त प्रभावित केले ते कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या तीन फिरकीपटूंनी. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज उमेश यादवने लक्ष वेधले. त्याने दुसºया सामन्यात १० बळी घेण्याचा पराक्रम केला. भारतीय खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजाला १० बळी मिळवणे सोपे नसते. त्यातच अंतिम संघासाठी उमेश यादवला पहिली पसंतीही नव्हती. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह हे भारताचे मुख्य गोलंदाज मानले जातात. त्यामुळेच माझ्या मते उमेश, रिषभ व पृथ्वी यांच्या रूपाने भारताला सर्वांत मोठा फायदा झाला आहे.