पाकिस्तानात सुरू असलेल्या पाकिस्तान सुपर लीगमध्ये (PSL 2022) शुक्रवारी क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि पेशावर जाल्मी यांच्यात खेळविण्यात आलेल्या सामन्यात पेशावर संघानं क्वेटा विरोधात तब्बल १९१ धावांचं लक्ष्य गाठलं. शोएब मलिकनं सामन्यात दमदार फलंदाजी करत पेशावर संघाला विजय प्राप्त करुन दिला. क्वेटाच्या गोलंदाजांना सुरुवातीला चांगलं यश मिळालं होतं. पण पेशावरच्या मधल्या फळीतील फलंदाजांनना रोखण्यात क्वेटाचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले.
क्वेटाच्या संघानं १९१ धावांचा डोंगर उभारूनही पेशावरनं रोमांचक लढतीत सरफराज खानच्या नेतृत्वाखालील क्वेटाच्या संघाला धूळ चारली. सामन्यात एका प्रसंगानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. क्वेटाचा गोलंदाज नसीम शाह इतर गोलंदाजांच्या तुलनेच चांगली गोलंदाजी करत होता. पण असं असूनही कर्णधार सरफराजनं त्याच्या पसंतीचं क्षेत्ररक्षण नियुक्त केलं होतं. फलंदाजांकडून सडकून समाचार घेतला जात असताना गोलंदाज नसीम शाह त्याच्या पसंतीचं क्षेत्ररक्षण असावं यासाठी कर्णधार सरफराज खानकडे हात जोडून विनंती करताना पाहायला मिळाला. पण सरफराज काही ऐकायला तयार नव्हता. अखेरीस क्वेटाच्या संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं.
वेगवान गोलंदाज नसीमसोबतच इतर सर्वच गोलंदाजांनी जवळपास प्रति षटक १० च्या सरासरीनं धावा दिल्या होत्या. नसीम यानं ३.४ षटकांमध्ये ५.१९ च्या इकोनॉमी रेटनं केवळ १९ धावा दिल्या होत्या आणि १ विकेट देखील मिळवली होती. पेशावरच्या डावाचं १६ वं षटक नसीम टाकत होता. पहिले तीन चेंडू टाकल्यानंतर चौथ्या चेंडूवेळी नसीम यानं फाइन लेगवर क्षेत्ररक्षणासाठी उभ्या असलेल्या खेळाडूला ३० यार्ड सर्कलच्या आत आणि मिडविकेटमध्ये एक खेळाडू तैनात करण्याची इच्छा सरफराज खानकडे व्यक्त केली. पण कर्णधार काही त्याचं ऐकत नव्हता. सरफराज नसीमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत होता. अखेरीस नसीम थेट हात जोडून सरफराजकडे विनंती करताना पाहायला मिळाला. त्यावेळी पेशावर संघाला विजयासाठी २७ चेंडूत ४३ धावांची आवश्यकता होती. शोएब मलिक आणि हुसैन तलक फलंदाजी करत होते. शोएब मलिकनं ३२ चेंडूत ४८ धावांची तर हुसैन तलत यानं २९ चेंडूत ५२ धावांची खेळी साकारुन संघाला विजय प्राप्त करुन दिला.