Join us  

PSL 2023: दोन यॉर्कर अन् खेळ खल्लास! गोलंदाजांनी पळवला तोंडचा घास, रंगली काँटे की टक्कर

अवघ्या १ धावेमुळे झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:43 AM

Open in App

Pakistan Super League: भारतात काल पहिल्यावहिल्या महिला IPL साठीचा (WPL 2023) लिलाव पार पडला. याच दरम्यान पाकिस्तानमध्ये PSL मध्ये एक अटीतटीचा सामना रंगलेला दिसला. पहिला सामना लाहोर कलंदर आणि मुलतान सुलतान यांच्यात झाला. लीगच्या नव्या मोसमातील हा पहिलाच सामना खूपच जबरदस्त ठरला. क्रिकेटमध्ये खेळाचा निकाल बदलण्यासाठी एक चेंडूही पुरेसा असतो, असे म्हणतात. पण, इथे एक नव्हे तर दोन चेंडूंमुळे अख्खा सामना पालटला. महत्त्वाचे म्हणजे हे दोन्ही चेंडू यॉर्कर होते. PSL 2023 चा सलामीचा सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला असला तरी दोन यॉर्कर्सनी निकालाची दिशा आधीच ठरवली होती.

सामन्यात लाहोर कलंदरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ गडी गमावून १७५ धावा केल्या. प्रत्युत्तरात मुलतान सुलतान्सनेही ६ विकेट गमावल्या मात्र त्यांना केवळ १७४ धावा करता आल्या आणि लाहोरने केवळ १ धावेने सामना जिंकला. खरे पाहता मुलतान सुलतान्स संघाला हा सामना बरेच चेंडू शिल्लक ठेवून जिंकता आला असता पण २ यॉर्कर्स चेंडूंनी त्यांचे मनसुबे उधळून लावले.

३० चेंडूत ४९ धावांची गरज, ८ विकेट्स हातात, तरीही झाला पराभव

१७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुलतान सुलतान्स संघाला शेवटच्या ५ षटकांत ४९ धावा करता आल्या. खरे पाहता, या खेळपट्टीवर सामना जिंकणे फारसे अवघड नव्हते. मोहम्मद रिझवान आणि डेव्हिड मिलर हे दोन तगडे फलंदाज क्रीजवर होते आणि ८ विकेट्स शिल्लक होत्या. मुलतान सुलतानला विजय दृष्टिपथात होता. पण, लाहोर कलंदरकडून आलेल्या दोन यॉर्कर्सनी मुलतानच्या विजयाच्या आशांना सुरूंग लावला.

२ यॉर्कर्स आणि खेळ खल्लास!

१६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर दुखापतीतून परतणाऱ्या शाहीन शाह आफ्रिदीने पहिला यॉर्कर टाकला. ७५ धावांची खेळी केलेला नि खेळपट्टीवर स्थिरावलेला रिझवानच्या त्यावर क्लीन बोल्ड झाला. त्यानंतर १९व्या षटकांत हारिस रौफने दुसरा यॉर्कर चेंडू टाकला. त्या यॉर्करने सेट झालेल्या डेव्हिड मिलरला २५ धावांवर तंबूत पाठवलं नि मुलतान सुलतान्सला पराभवाच्या दिशेने ढकललं. त्यानंतर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला पण मुलतानला एका धावेने पराभूत व्हावे लागले.

टॅग्स :पाकिस्तानआयपीएल २०२२
Open in App