PSL 2023 Last over thriller: बर्याच वेळा क्रिकेटमध्ये अशी परिस्थिती उद्भवते की सामना शेवटच्या षटकापर्यंत पोहोचतो आणि निकाल काही वेगळाच लागतो. नुकताच मुलतान सुल्तान्स विरुद्ध कराची किंग्ज सामना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळला गेला. या सामन्यात मुलतानचा संघ विजयी ठरला. पण त्याआधी जो थरार पाहायला मिळाला, तो क्वचितच कधी पाहायला मिळतो. त्याचे असे झाले की, शेवटच्या षटकात कराची किंग्जला विजयासाठी २२ धावा करायच्या होत्या. एका षटकांत ६ चेंडू असतात, पण मुलतानचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने संपूर्ण ९ चेंडू टाकले. असे असूनही कराची किंग्जचा संघ सामना जिंकू शकला नाही.
शेवटच्या ओव्हरचा थरार
PSL मधील शेवटच्या षटकाचा थरार सविस्तर जाणून घेऊया. पहिल्याच चेंडूवर अब्बास आफ्रिदीने नो बॉल टाकला, ज्यावर स्ट्राईकवर उभ्या असलेल्या इमाद वसीमने षटकार मारला. म्हणजे ज्या कराची किंग्सला ६ चेंडूत २२ धावा करायच्या होत्या, त्यांना ६ चेंडूत १५ कराव्या लागणार होते. यानंतर अब्बासने टाकलेल्या पहिल्या चेंडूवर इमादने एक धाव घेतली आणि बेन कटिंगला स्ट्राईक दिली. तेव्हा ५ चेंडूत १४ धावा हव्या होत्या. अब्बास आफ्रिदीने दुसरा चेंडू वाईड टाकला, त्यामुळे संघाला ५ चेंडूत १३ धावांची गरज होती. त्यामुळे सामन्याचा थरार आणखी वाढला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर पुन्हा षटकार मारण्यात आला. म्हणजेच आता कराची किंग्जला विजयासाठी ४ चेंडूत ७ धावांची गरज होती आणि त्यांच्या हातात ६ विकेट्स होत्या.
शेवटच्या ३ चेंडूत झाल्या नाहीत ६ धावा
मुलतान सुलतान्सकडून आफ्रिदीने पुन्हा तिसरा चेंडू वाईड टाकला. म्हणजे त्यामुळे कराचीला विजयासाठी ३ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या. हे काम सोपे होते पण बेन कटिंग स्ट्राईकवर असताना मुलतानचा गोलंदाज अब्बास आफ्रिदीने ते होऊ दिले नाही. त्याने चौथ्या चेंडूवर बेन कटिंगची विकेट घेतली. त्यानंतर पाचव्या चेंडूवर पुन्हा १ धाव काढण्यात आली. तर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कराची किंग्जला ५ हव्या असतानाच अब्बास आफ्रिदीने त्याला फक्त एक धाव काढू दिली. त्यामुळे सामना मुलतान संघाने जिंकला.