पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) लाहोर कलंदरचा संघ सूसाट फॉर्मात आहे. संघाने पेशावर झाल्मीचा ४० धावांनी पराभव केला. लाहोरचा फलंदाज फखर जमान, अब्दुल्लाह शफिक व सॅम बिलिंग्स यांनी दमदार फलंदाजी करताना कलंदर संघला ३ बाद २४१ धावांचा डोंगर उभा करून दिली. त्यानंतर गोलंदाजीत शाहिन शाह आफ्रिदीने पाच विकेट्स घेऊन पेशावर झाल्मीची हवाच काढली. शाहीन आफ्रिदीने आपल्या गोलंदाजीने बाबर आझमच्या संघाला पूर्णपणे बॅकपुटमध्ये ढकलले आणि ५ विकेट घेत लाहोर करंदर संघाला विजय मिळवून दिला. धोकादायक दिसत असलेला टॉम कोहलर कॅडमोर पॅव्हेलियनमध्ये परतल्याने लाहोरला मोठा दिलासा मिळाला. यानंतर आफ्रिदीने बाबरलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. अशा प्रकारे संघाने पीएसएलमधील तिसरा विजय मिळवला. २४२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पेशावर झल्मीच्या संघाची सुरुवात खूपच डळमळीत झाली. आफ्रिदीने पहिल्याच चेंडूवर सलामीवीर मोहम्मद हरिसची बॅट तोडली आणि त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले. शाहीन इथेच थांबला नाही, तर यानंतरही या गोलंदाजाने बाबर आझमला पॅव्हेलियनमध्ये पाठवून विजय निश्चित केला. हा चेंडू इतका भन्नाट होता की बाबर आझम पूर्णपणे चुकला आणि क्लीन बोल्ड झाला.
सायम अय्युब आणि कोहलर कॅडमोर यांच्यात ९१ धावांची भागीदारी झाली, पण ही भागीदारी तुटताच संघाला त्यानंतर सामन्यात पुनरागमन करता आले नाही. भानुका राजपक्षे आणि रोव्हमन पॉवेल यांनी आपली भूमिका बजावली पण ते जास्त वेळ क्रीजवर टिकू शकले नाहीत. पेशावरचा संघ सतत विकेट गमावत राहिला. शाहीन आफ्रिदीने ४ षटकांत ४० धावा देताना ५ बळी घेतले. पेशावर झल्मीचा संघ २०१ धावा करू शकला.लाहोर कलंदर्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर फखर जमानने ४५ चेंडूत ९६ धावा ठोकल्या. त्याने दुसऱ्या विकेटसाठी अब्दुल्ला शफीकसोबत १२० धावांची भागीदारी केली. त्यानंतर सॅम बिलिंग्ससोबत ८८ धावांची भागीदारी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"