PSL 2024 Live Streaming Problem: आयपीएलप्रमाणे पाकिस्तानात देखील पाकिस्तान सुपर लीग खेळवली जाते. सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचा नववा हंगाम खेळवला जात आहे. पाकिस्तानी चाहते PSL ची तुलना जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलशी (IPL) करतात. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची पीएसएलच्या यंदाच्या हंगामाच्या सुरूवातीलाच फजिती झाली. शनिवारपासून PSL 2024 ला सुरूवात झाली आहे. रविवारी दोन सामने खेळवले गेले. दुसऱ्या सामन्यात मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्ज हे संघ आमनेसामने होते. शोएब मलिकने अर्धशतकी खेळी करून देखील कराचीला हा सामना जिंकता आला नाही.
दरम्यान, एका अनोख्या घटनेमुळे या सामन्याला भलतीच प्रसिद्धी मिळाली. PSL सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग सामन्याच्या मध्यभागी अचानक थांबले अन् एकच खळबळ माजली. मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान सामन्याचे थेट प्रक्षेपण जवळपास १५ मिनिटे बंद राहिले. भारतासह अनेक देशांमध्ये लाईव्ह प्रसारण करताना अडचण आली. भारतात टीव्हीवर पीएसएलचे प्रक्षेपण केले जात नाही, परंतु फॅनकोड ॲपद्वारे स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होत आहे. पण ॲपवर लाईव्ह स्ट्रीमिंग होत नसल्यामुळे मुल्तान सुल्तान आणि कराची किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात चाहत्यांना सुमारे १५ मिनिटे व्यत्यय आला.
पाकिस्तानची फजिती
पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामाचे लाईव्ह स्ट्रीमिंगचे अधिकार असलेल्या Tapmad ने या समस्येबाबत निवेदन जारी केले आहे. "HBL PSL 9 च्या लाईव्ह फीडमध्ये तांत्रिक समस्या येत असल्याची माहिती देताना आम्हाला खेद वाटतो. चाहत्यांच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत", असे Tapmad कडून सांगण्यात आले. मुल्तान सुल्तानविरूद्धच्या सामन्यात शोएब मलिकने ५३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला चीअर करण्यासाठी पत्नी सना जावेदने हजेरी लावली होती.
आयपीएलच्या धर्तीवर पाकिस्तान सुपर लीग ही स्पर्धा खेळवली जाते. मुल्तान सुल्तान, कराची किंग्ज, इस्लामाबाद युनायटेड, पेशावर झाल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि लाहोर कलंदर्स हे सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. मागील दोन वर्ष शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वातील लाहोरच्या संघाने स्पर्धेचा किताब जिंकला.
Web Title: PSL 2024 Live Streaming Problem Live streaming stopped during the match between Multan Sultans and Karachi Kings, Shoaib Malik scored his fifty while his wife Sana Javed was also present
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.