PSL 7 : Tim David - इंडियन प्रीमिअर लीगच्या २०२१च्या पर्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) कडून खेळून इतिहास घडवणाऱ्या सिंगापूरच्या टीम डेव्हिडनं मंगळवारी पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( PSL) धुरळा केला. आयपीएलमध्ये खेळणारा पहिल्या सिंगापूरचा खेळाडू ठरलेल्या डेव्हिडनं PSL मध्ये मुल्तान सुल्तान संघाला काल संकटातून बाहेर काढले. ३ बाद ७८ अशी संघाची धावसंख्या असताना डेव्हिड मैदानावर आला अन् इस्लामाबाद युनायटेडच्या गोलंदाजांना धु धु धुऊन गेला... त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर मुल्ताननं २० षटकांत ५ बाद २१७ धावांचा डोंगर उभा केला आणि नंतर २० धावांनी सामना जिंकलाही.
प्रथम फलंदाजी करताना मुल्तान संघाला शान मसूदने चांगली सुरूवात करून दिली. कर्णधार मोहम्मद रिझवान ( १२) दुर्दैवीरित्या धावबाद झाला, तर सोहैब मक्सूदनही ( १३) धावबाद होऊन माघारी परतला. मसूदने ३१ चेंडूंत ४३ धावा केल्या. मुल्तानचे आघाडीचे तीन फलंदाज १०.२ षटकांत ७८ धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर रिली रोसोव व टीम डेव्हिड यांनी चौथ्या विकेटसाठी ९ षटकांत ११० धावा जोडल्या. टीम डेव्हिडनं २४४.८२च्या स्ट्राईक रेटने २९ चेंडूंत ७८ धावा चोपल्या. त्यापैकी ६० धावा ( ६ चौकार व ६ षटकार) या अवघ्या १२ चेंडूंत आल्या. रोसोव ३५ चेंडूंत ४ चौकार व ६ षटकारांच्या मदतीनं ६७ धावांवर नाबाद राहिला.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू, पण खेळतो सिंगापूरसाठी, कोण आहे टीम डेव्हिड?डेव्हिड हा मुळचा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो सिंगापूर संघाचे प्रतिनिधित्व करतो. आयसीसीनं १०६ सदस्य देशांना ट्वेंटी-२०तील आंतरराष्ट्रीय दर्जा दिला आहे. ६ फुटांच्या डेव्हिडनं १५८पेक्षा अधिक स्ट्राईक रेटनं १४ आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ५५८ धावा केल्या आहेत. त्यानं एकूण ४९ ट्वेंटी-२० सामने खेळले आहेत आणि त्यात बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीग मधील सामन्यांचा समावेश आहे. त्यात त्यानं ११७१ धावा केल्या आहेत.