पाकिस्तानमध्ये काल सायंकाळी पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना झाला. यामध्ये विजेत्या संघाला जे बक्षीस देण्यात आले त्यावरून पीएसएलची खिल्ली उडविली जात आहे. पाकिस्तानी क्रिकेटर पीएसएल ही आयपीएलपेक्षा कशी चांगली, कशी मोठी आहे, याची टिमकी मिरवत होते. परंतू बक्षिसाच्या रकमेने बाप हा बापच असतो, अशा शब्दांत पाकिस्तानी क्रिकेट बोर्डावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे.
कालचा सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. लाहोर कलंदर्सने मुल्तान सुल्तांसला एका धावेने हरविले. सलग दुसऱ्यांदा चषक जिंकणाऱ्या शाहिन आफ्रिदीच्या लाहोर संघाला 120 दशलक्ष पाकिस्तानी रुपये तर उपविजेत्या मुल्तान संघाला 48 दशलक्ष पाकिस्तानी रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
म्हणजेच भारतीय रुपयांत जर मोजायचे झाले तर विजेत्या संघाला साडे तीन कोटी रुपये आणि रनरअप संघाला १.५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले आहे. यावरून आता पाकिस्तानची खिल्ली उडविली जात आहे.
महत्वाचे म्हणजे भारतात सुरु असलेल्या महिला प्रिमिअर लीगच्या ऑक्शनमध्ये स्मृती मंधानाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने 3.4 कोटी रुपये दिले होते. ही रक्कम आणि पीएसएल विजेत्याची रक्कम एकसमान आहे. आयपीएल विजेत्यांच्या रकमेचा विचार केला तर गेल्या सिझनला गुजरात टायटन्सला २० कोटी रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या राजस्थान रॉयल्सला १३ कोटी रुपये मिळाले होते.