पाकिस्तानचा क्रिकेट संघ सध्या आयसीसी ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये ज्या पद्धतीनं जबरदस्त कामगिरी करत आहे त्याचं जोरदार कौतुक केलं जात आहे. बाबर आझमच्या संघानं पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव करुन इतिहास घडवला. पाकनं भारताला वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच नमवलं. त्यानंतर पाकिस्ताननं न्यूझीलंडचा देखील पराभव केला. पाकिस्तान एका बाजुला जबरदस्त कामगिरी करत असताना पाकिस्तानात मात्र एका लाइव्ह टेलिव्हिजन कार्यक्रमात दिग्गज माजी गोलंदाज शोएब अख्तर याला अपमानाला सामोरं जावं लागलं.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यानंतर पाकिस्तानात एका टेलिव्हिजन चॅनलवर खास क्रिकेट शोचं आयोजन करण्यात आलं होतं. यात कार्यक्रमाच्या अँकरनं शोएब अख्तर याचा अपमान करत त्याला लाइव्ह कार्यक्रमातून निघून जायला सांगितलं. विशेष म्हणजे या कार्यक्रमात वेस्ट इंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स देखील उपस्थित होते. याशिवाय पाकिस्तानचे अनेक माजी खेळाडूंचीही उपस्थिती होती.
नेमकं काय घडलं?पाकिस्तानच्या 'पीटीव्ही' वाहिनीवर 'गेम ऑन' नावाचा शो सुरू होता. यात शोएब अख्तरनं पाकिस्तानचे गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचं कौतुक केलं. पाकिस्तान सुपर लीगमधील लाहौर कलंदर्स टीममधून हे दोन गोलंदाज पुढे आले, असं शोएब अख्तरनं म्हटलं. त्यावर कार्यक्रमाचा अँकर नौमान नियाज यांनी अख्तरला रोखलं. "शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ क्रिकेट संघातून आला आहे", असं नौमान यांनी म्हटलं. त्यावर शोएबनं "मी हॅरीस राऊफ याच्याबाबत बोलतोय", असं म्हटलं. त्यावर नौमान यांचा पारा चढला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करण्यास सुरुवात केली. "तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस. मी इथं सांगू इच्छितो की जर तुला ओव्हरस्मार्ट बनायचं आहे तर तू शोमधून निघून जाऊ शकतोस आणि हे मी तुला ऑन एअर सांगत आहे", असं नौमान म्हणाले.
ब्रेकनंतर कार्यक्रमाला पुन्हा सुरुवात झाली आणि शोएब अख्तरनं झालेला प्रसंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण त्यात काही यश आलेलं पाहायला मिळालं नाही. त्यानंतर शोएब अख्तरनं शो मधून निघून जाण्याचा निर्णय घेतला. "मला खूप वाईट वाटलं. मी पीटीव्हीमधून माझा राजीनामा देत आहे. राष्ट्रीय वाहिनीवर माझ्यासोबत ज्यापद्धतीनं बोललं गेलं ते मला योग्य वाटत नाही. त्यामुळे मी इथून निघून जात आहे. धन्यवाद", असं म्हणत शोएब अख्तर कार्यक्रमातून निघून गेला. दरम्यान, शोएब अख्तरनं त्याच्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ ट्विट करत नेमकं काय घडलं याची सर्व कहाणी सांगितली आहे.