- अयाझ मेमन
नुकत्याच झालेल्या अॅडलेड कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजारा याने टीम इंडियाला केवळ मदतच केली नाही, तर चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी सुरुवात मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या या कामगिरीने टीकाकारांना त्याच्यातील क्षमता दिसून आली आणि तो विदेशातही चांगल्या धावा करू शकतो, हे सिद्ध झाले. पुजाराला कसोटी क्रिकेटमधून खूप काळापासून बाहेर ठेवण्यात आले होते (२०१५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत). ऑस्ट्रेलियाचा दौरा सुरू होण्यापूर्वीसुद्धा त्याचे संघातील स्थान अनिश्चित होते. आता त्याने संधी मिळताच दोन डावांत १२३ आणि ७१ धावांची खेळी केली.
जाहीरपणे पुजाराला बाहेर ठेवण्याचे कारण म्हणजे त्याची संथ धावगती आहे. त्याच्या करिअरमधील जे आकडे दाखविले जातात ते योग्य नाही आणि ते वास्तविक विचित्रही आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, अंतिम संघात परतल्यानंतर पुजाराने खंबीर मानसिकता आणि ‘ड्रामॅटिक फॅशन’सह एंट्री केली. श्रीलंकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दोन चेंडूंवर जीवदान मिळाल्यानंतर, त्याने ३१२ चेंडूंत नाबाद १४५ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ११७ धावांनी जिंकला होता.
इंग्लंडमध्ये पुजाराने पुनरागमनासाठी संघर्ष केला. नॉटिंगहॅममध्ये दुसºया डावात त्याने महत्त्वपूर्ण ७२ धावा केल्या. त्याच्या या कामगिरीने भारताने सामना जिंकला. त्यानंतर, त्याने १३२ नाबाद धावा केल्या होत्या. हा सामना भारताने ६० धावांनी गमावला. कारण पुजाराला इतरांकडून मदत मिळाली नाही. ६५ कसोटी सामन्यांत पुजाराने ५,०९९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची ५०.४८ अशी सरासरी आहे. ५० पेक्षा अधिक सरासरीने फार कमी फलंदाजांनी धावा केल्या आहेत. सध्याच्या भारतीय संघात केवळ विराट कोहलीने ५३.९६ अशा सरासरीने धावा केल्या आहेत (७४ सामने, ६३६८). कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याचा स्ट्राइक रेट ५७.९६ असा आहे. त्यामुळे पुजाराचा प्रयत्न दुर्लक्षित होत आहे. भारतीय कर्णधाराचा खेळ नैसर्गिक आणि आक्रमक आहे आणि गेल्या दोन वर्षांत तो विदेशातही चांगला खेळत आहे. फलंदाजीत सगळेच एकसारखेच खेळतील असेही नाही. कारण कसोटी क्रिकेटमध्ये स्थितीनुसार खेळ करावा लागतो. एकच फॉर्म्युला सगळ्यांना लागू होत नाही. यासाठी दोन महान खेळाडूंच्या स्ट्राइक रेटवर नजर टाकावी लागेल.
द्रविड-लक्ष्मण वेगळ्या शैलीचे फलंदाज
राहुल द्रविड याने १६४ कसोटी सामन्यांत १३,२८८ धावा ५२.३१च्या सरासरी आणि ४२.५१ या स्ट्राइक रेटने केल्या आहेत. लक्ष्मणने १३४ कसोटी सामन्यांत ४२.५१ची सरासरी आणि ४९.३७ च्या स्ट्राइक रेटने ८,७८१ धावा केल्या आहेत. यावरून जे कुणीही म्हणत असतील की, द्रविड आणि लक्ष्मण मोठे खेळाडू नव्हते. कारण त्याचा स्ट्राइक रेट हा ५० पेक्षा कमी आहे, त्यांचे मानसिक स्वास्थ्य तपासावे लागेल. हे दोघेही भारतीय क्रिकेट इतिहासातील महान खेळाडू आहेत. ते वेगळ्या शैलीचे होते. द्रविडने एक दशकाहून अधिक काळ फलंदाजी केली. लक्ष्मण हा भारतीय संघाला चांगले सामने जिंकून देणाºयांपैकी एक आहे. माझा सांगण्याचा मुद्दा हाच आहे की, स्ट्राइक रेट हा चुकीचे ठरवू शकतो. समोरील गोलंदाजी कशा पद्धतीची आहे, फलंदाज कोणत्या स्थितीत आहे, सामन्याची स्थिती काय, या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. अॅडलेड कसोटी सामन्यात पुजाराने खेळात बदल केला. एक ‘स्टोनवॉलर’ची भूमिक बदलून त्याने संघाला कसे पुढे नेता येईल, यावर भर दिला.
(लेखक संपादकीय सल्लागार आहेत)
Web Title: Pujar gave a glowing answer to commentators
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.