ठळक मुद्देपुजारा-रहाणे जोडीनं चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. लोकेश राहुल फीट झाल्यामुळे त्याला अभिनव मुकुंदच्या जागेवर संघात स्थान देण्यात आले.कर्णधार विराट कोहली स्वस्तात बाद झाला.
कोलंबो, दि. 3 - शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाने आज सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीमध्ये रहाणे आणि पुजाराच्या शतकी खेळीच्या बळावर 344 धावांचा डोंगर उभा केला. गॉल कसोटीप्रमाणे दुसऱ्या कसोटीतही चेतेश्वर पुजारानं शतकी खेळी केली. पुजाराच्या खेळीच्या बळावर भारताने दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाखेर तीन बाद 344 धावांचा डोंगर उभा केला. मुंबईकर अजिंक्य रहाणेनं पुजाराला चांगली साथ दिली. रहाणे 154 चेंडूत आपलं शतक साजरं केलं. दिवसाखेर रहाणे 103 धावांवर खेळत आहे. पुजारा-रहाणे जोडीनं चौथ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली.
पुजारा-रहाणेच्या खेळीमुळे कोलंबो कसोटीत भारताने आपली पकड मजबूत केली आहे. 165 चेंडुत पुजाराने 100 धावा काढल्या. दिवसाखेर पुजारा 128 धावांवर नाबाद आहे. आतापर्यंत त्याच्या खेळीत 10 चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. चेतेश्वर पुजाराचं हे आपल्या कारकिर्दीतलं 13 वं शतक ठरलं. यादरम्यान चेतेश्वरने कसोटीमध्ये 4 हजार धावांचा टप्पाही पार केला. आपल्या कसोटी कारकिर्दीतला पुजाराचा हा ५० वा सामना आहे, त्यातच आज पुजाराच्या नावाची मानाच्या अर्जुन पुरस्काराठी शिफारस करण्यात आलेली आहे. त्यामुळे कोलंबो कसोटीत चेतेश्वर पुजासाठी एक अनोखा त्रिवेणी संगम जुळून आल्याचं पहायला मिळले.
दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. लोकेश राहुल फीट झाल्यामुळे त्याला अभिनव मुकुंदच्या जागेवर संघात स्थान देण्यात आले. लोकेश राहुलने दमदार पुनरागमन करताना अर्धशतकी खेळी केली. तो (57) धावांवर धावबाद झाला. हेरथच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या नादात राहुल आणि पुजारामध्ये झालेल्या गडबडीमुळे, राहुल धावचीत झाला. कर्णधार दिनेश चंडीमलच्या अचूक फेकीवर त्याला माघारी परतावं लागलं. कर्णधार विराट कोहलीला आज सूर गवसला नाही. त्याला हेराथने मॅथ्यूजकरवी झेलबाद केले. सलामीवीर शिखर धवन (35) धावांवर बाद झाला. त्याला परेराने पायचीत केले. शिखर धवन आणि लोकेश राहुलने चांगली सुरुवात केली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली होती. श्रीलंकेकडून दिलरुवान पेरेरा आणि रंगना हेरथ यांनी प्रत्येकी 1-1बळी घेतला. भारतीय संघाची पहिल्या कसोटीतली फलंदाजी पाहता, भारतीय डावाला गुंडाळण्यासाठी श्रीलंकेला मोठी मेहनत घ्यावी लागणार असं दिसतंय.
50 व्या सामन्यात पुजाराच्या 4000 धावा
चेतेश्वर पुजारा आपल्या कसोटी कारकिर्दीतील 50 वा कसोटी सामना खेळत आहेत. कसोटी सामन्याचं अर्धशतक पुर्ण करत असताना चेतेश्वर पुजाराने चार हजार धावांचा टप्पा पुर्ण केला आहे. गुरुवारी चेतेश्वर पुजारा मैदानात खेळण्यासाठी उतरला तेव्हा त्याला चार हजार धावा पुर्ण करण्यासाठी फक्त 34 धावांची गरज होती. पुजाराने 98 चेंडूंचा सामना करताना 34 धावा पुर्ण केल्या आणि चार हजार धावांच्या क्लबमध्ये एंट्री केली. पुजाराने 84 डावांमध्ये 4000 धावांचा टप्पा पार केला आहे. चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविडच्या चार हजार धावा पुर्ण करण्यामध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे राहुल द्रविडने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत 84 डावांमध्येच चार हजार धावा पुर्ण केल्या होत्या. राहुल द्रविड आणि चेतेश्वर पुजारापेक्षाही जलदगतीने चार हजार धावा पुर्ण करण्याचा रेकॉर्ड विरेंद्र सेहवाग आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांच्या नावावर आहे. विरेंद्र सेहवागने 79 तर सुनील गावस्कर यांनी 81 डावांमध्ये हा रेकॉर्ड केला होता. महत्वाची गोष्ट म्हणजे विरेंद्र सेहवाग आणि सुनील गावस्कर दोघेही ओपनर फलंदाज होते.
Web Title: Pujara, Rahane tons help India take charge
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.