Join us  

पुजारा-श्रेयस यांनी भारताला सावरले; बांगलादेशच्या गोलंदाजांनी पुन्हा सतावले

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताला कर्णधार लोकेश राहुल (२२) आणि शुभमन गिल (२०) यांनी ४१ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 6:01 AM

Open in App

चटगाव : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका १-२ अशी गमावल्यानंतर भारतीय संघाची बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीही अडखळती सुरुवात झाली. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांनी पाचव्या गड्यासाठी ३१७ चेंडूंत १४९ धावांची भागीदारी केल्याने भारताचा डाव सावरला. पहिल्या दिवसअखेर भारताने ९० षटकांत ६ बाद २७८ धावा केल्या.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारताला कर्णधार लोकेश राहुल (२२) आणि शुभमन गिल (२०) यांनी ४१ धावांची सलामी देत चांगली सुरुवात करून दिली. दोघांनाही चांगल्या सुरुवातीचा फायदा घेता आला नाही. यानंतर प्रमुख फलंदाज विराट कोहली (१) झटपट बाद झाला. तैजुल इस्लामने त्याला पायचित पकडत भारताला मोठा धक्का दिला. येथून भारताला सावरले ते ऋषभ पंतने. पंतने आपल्या आक्रमक शैलीत बांगलादेशच्या गोलंदाजांचा समाचार घेताना भारतावरील दडपण दूर केले. 

पंतने ४५ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांचा तडाखा देत भारताच्या धावगतीला वेग दिला. मेहदी हसनने त्याला बाद करून भारताची ४ बाद ११२ धावा अशी अवस्था केली. बांगलादेश येथून पकड मिळवणार असे दिसत असताना पुजारा-अय्यर यांनी डाव सावरला. पुजाराने आपला फॉर्म सिद्ध करताना २०३ चेंडूंत ११ चौकारांसह ९० धावांची संयमी खेळी करत बांगलादेशची परीक्षा घेतली. त्याचे शतक केवळ दहा धावांनी हुकले. दुसरीकडे, अय्यरने दिवसभर नाबाद राहताना १६९ चेंडूंत १० चौकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. दिवसाच्या अखेरच्या चेंडूवर अक्षर पटेल (१४) मेहदी हसनच्या चेंडूवर पायचीत बाद झाला. बांगलादेशकडून तैजुलने ३, तर मेहदीने २ बळी घेतले.

१०० हून अधिक चेंडूंचा सामना (पुजाराच्या पदार्पणापासून)१. जो रुट (इंग्लंड) : ७५ वेळा, डाव : २३२, टक्केवारी : ३२.३३२. ॲलिस्टर कूक (इंग्लंड) : ६२ वेळा, डाव : १८३, टक्केवारी : ३३.८८३. अझर अली (पाकिस्तान) : ६१ वेळा, डाव : १६६, टक्केवारी : ३६.७५४. चेतेश्वर पुजारा (भारत) : ५६ वेळा, डाव : १६५, टक्केवारी : ३३.९४५. विराट कोहली (भारत) : ५४ वेळा, डाव : १७४, टक्केवारी : ३१.०३

लकी अय्यर!श्रेयस अय्यर ७८ धावांवर खेळत असताना इबादत हुसैनने यष्ट्यांचा अचूक वेध घेतला. यावेळी, चेंडू यष्ट्यांना स्पर्श करून गेल्याने बेल्सची लाइटही पेटली. मात्र, बेल्स खाली न पडल्याने अय्यरला बाद ठरविले नाही. यामुळे बांगलादेशचे खेळाडूही अचंबित राहिले. यानंतर अय्यर बाद की नाबाद यावर मोठी चर्चा रंगली. 

धावफलक भारत : लोकेश राहुल त्रि. गो. अहमद २२, शुभमन गिल झे. यासिर गो. तैजुल २०; चेतेश्वर पुजारा त्रि. गो. तैजुल ९०, विराट कोहली पायचीत गो. तैजुल १, ऋषभ पंत त्रि. गो. मेहदी हसन ४६, श्रेयस अय्यर खेळत आहे ८२, अक्षर पटेल पायचित गो. मेहदी हसन १४. अवांतर - ३. एकूण : ९० षटकांत ६ बाद २७८ धावा. बाद क्रम : १-४१, २-४५, ३-४८, ४-११२, ५-२६१, ६-२७८.गोलंदाज : इबादत हुसैन १७-१-६३-०; खलीद अहमद १२-२-२६-१; शाकिब अल हसन १२-४-२६-०; तैजुल इस्लाम ३०-८-८३-३; मेहदी हसन १८-४-७१-२; यासिर अली १-०-७-०.

गचाळ क्षेत्ररक्षणाचा भारताला फायदाबांगलादेशने गोलंदाजीत दमदार कामगिरी करताना भारताला जखडवून ठेवले. मात्र, त्याचवेळी त्यांच्याकडून क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका भारतासाठी फायदेशीर ठरल्या. झेल घेण्याच्या सोप्या संधी सोडल्याने बांगलादेशला सामन्यावर घट्ट पकड मिळवता आली नाही. 

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेश
Open in App