होव : भारत-ऑस्ट्रेलिया ७ जूनपासून इंग्लंडमध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) अंतिम सामना खेळतील. मात्र, या सामन्याआधी भारताचा चेतेश्वर पुजारा आणि ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ कौंटी क्रिकेट सामन्याद्वारे पूर्वतयारी करणार असून दोघेही ससेक्स संघाकडून तीन सामने एकत्र खेळतील.
ओव्हल येथे ७-११ जूनदरम्यान डब्ल्यूटीसी अंतिम सामना रंगेल. दीर्घ काळापासून पुजारा ससेक्स संघाचे कर्णधारपद सांभाळत आहे. तो ससेक्सकडून तिसऱ्या, तर स्मिथ चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ससेक्सकडून स्मिथ वॉर्सेस्टरशायर, लीसेस्टरशायर व ग्लेमॉर्गन या तीन संघांविरुद्ध खेळण्याची शक्यता आहे. याद्वारे स्मिथ डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासह १६ जूनपासून रंगणाऱ्या ॲशेस मालिकेसाठीही तयारी करेल.
स्मिथच्या ससेक्स संघाकडून खेळण्याविषयी पुजाराने सांगितले की, ‘आम्ही एकमेकांशी संपर्कात असतो, पण जास्तकरून आम्ही एकमेकांविरुद्ध खेळलो आहोत. आम्ही याआधीही कधीही एकाच संघातून खेळलेलो नाही. त्यामुळेच त्याच्यासोबत खेळण्याच्या विचाराने रोमांचित आहे.’
आम्ही डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात एकमेकांविरुद्ध खेळणार आहोत, मैदानावर आम्ही नेहमी एकमेकांना कडवी टक्कर दिली आहे, पण मैदानाबाहेर आम्ही चांगले मित्र आहोत. स्मिथसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्यास मी उत्साहित आहे. त्याच्याकडून शिकण्याचाही प्रयत्न करेन. स्मिथ खूप अनुभवी क्रिकेटपटू असून तो कशा प्रकारे तयारी करतो याकडे लक्ष देऊन शिकण्याचा प्रयत्न करेन - चेतेश्वर पुजारा