साऊथम्पटन : भरवाशाच्या चेतेश्वर पुजाराच्या निर्णायक शतकी खेळीच्या जोरावर भारताने चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी यजमान इंग्लंडविरुद्ध २७ धावांची नाममात्र आघाडी घेतली. पहिल्या दिवशी इंग्लंडला २४६ धावांत गुंडाळल्यानंतर भारताचा पहिला डाव २७३ धावांत संपुष्टात आला. यानंतर इंग्लंडने दुसºया डावात बिनबाद ६ धावा अशी सुरुवात केली.
बिनबाद १९ धावांवरुन दिवसाची सुरुवात केलेल्या भारताची फलंदाजी मोइन अलीच्या फिरकीपुढे कोलमडली. त्याने ६३ धावांत ५ बळी घेतले. स्टुअर्ट ब्रॉडनेही (३/६३) त्याला चांगली साथ दिली. लोकेश राहुल (१९) बाद झाल्यानंतर शिखर धवन (२३) पुन्हा चांगल्या सुरुवातीचा फायदा घेण्यात अपयशी ठरला. यानंतर पुजाराने कर्णधार विराट कोहलीसह डाव सावरला. दोघांनी तिसºया गड्यासाठी ९२ धावांची भागिदारी केली. यावेळी भारत मोठी आघाडी घेणार असे दिसत असताना कुरनने कोहलीला बाद करुन भारतीय फलंदाजीला सुरुंग लावला.
कोहलीने ७१ चेंडूत ६ चौकारांसह ४६ धावा केल्या. रहाणे (११), रिषभ पंत (०), हार्दिक पांड्या (४) व रविचंद्रन अश्विन (१) स्वस्तात परतले. पुजाराने अखेरपर्यंत टिकून राहत २५७ चेंडूत १६ चौकारांसह १३२ धावांची नाबाद खेळी केली. यामुळे भारताला नाममात्र आघाडी घेण्यात यश आले.संक्षिप्त धावफलक : इंग्लंड (पहिला डाव) : ७६.४ षटकात सर्वबाद २४६ धावा. भारत (पहिला डाव) : ८४.५ षटकात सर्वबाद २७३ धावा (चेतेश्वर पुजारा १३२*, विराट कोहली ४६; मोइन अली ५/६३, स्टुअर्ट ब्रॉड ३/६३) इंग्लंड (दुसरा डाव) : ४ षटकात बिनबाद ६ धावा.विराट कोहलीने या सामन्यात कसोटीत ६ हजार धावा पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा दहावा व जगातील ६६वा फलंदाज ठरला.