पुजाराच्या संथ फलंदाजीचा भारताला फटका

तिसरी कसोटी : ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर १९७ धावांची आघाडी घेत मिळविली पकड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 02:56 AM2021-01-10T02:56:27+5:302021-01-10T02:57:19+5:30

whatsapp join usJoin us
Pujara's slow batting hits India | पुजाराच्या संथ फलंदाजीचा भारताला फटका

पुजाराच्या संथ फलंदाजीचा भारताला फटका

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सिडनी: अनुभवी चेतेश्वर पुजाराची संथ फलंदाजी तसेच फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंंच्या जखमा भारतासाठी डोकेदुखी ठरल्याने ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर शनिवारी १९७ धावांची आघाडी घेत पकड मिळविली आहे. पॅट कमिन्सच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताला पहिल्या डावात २४४ धावात रोखल्यानंतर मार्नस लाबुशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नाबाद अर्धशतकी भागीदारीच्या बळावर ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहोचला. चेतेश्वर पुजारासह अनुभवी फलंदाज फारच बचावात्मक खेळले. त्यामुळे दडपण वाढले. पुजाराने ५० धावांसाठी १७६ चेंडू खेळून काढले. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी यजमानांनी २ गड्यांच्या मोबदल्यात १०३ धावांपर्यंत वाटचाल केली. पहिल्या डावतील शतकवीर स्मिथ २९ आणि लाबुशेन ४७ धावांवर नाबाद आहेत. या दौऱ्यात फिटनेसच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या भारताला दोन धक्के बसले.

पहिल्या डावात ३३८ धावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दोन फलंदाज ३५ धावात गमावले होते, मात्र स्मिथ - लाबुशेन यांनी ६८ धावांची नाबाद भागीदारी करीत भारताच्या आशेवर पाणी फेरले. विल पुकोव्हस्कीचा झेल सिराजच्या चेंडूवर पंतऐवजी क्षेत्ररक्षणासाठी आलेल्या रिद्धिमान साहाने टिपला. डेव्हिड वॉर्नर १३ धावांवर अश्विनच्या चेंडूवर पायचित झाला. त्याआधी कमिन्सने २९ धावात ४, हेजलवूडने ४३ धावात ३ आणि स्टार्कने ६१ धावात एक गडी बाद केला. भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले. ऑस्ट्रेलियाने ९४ धावांची आघाडी संपादन केली. पुजाराच्या फटक्यात कुठलाही आत्मविश्वास नव्हता. तो स्ट्राईक रोटेट करण्यातही अपयशी ठरला. पुजाराने पहिल्या शंभर चेंडूंवर एकही चौकार मारला नव्हता. अजिंक्य रहाणे (२२) आणि ऋषभ पंत (३६) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. रवींद्र जडेजाने नाबाद २८ धावांची खेळी केली.

जडेजाचा अंगठा दुखावला, पंतही जखमी
अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या डाव्या हाताचा अंगठा दुखावल्याने तो गोलंदाजी करू शकणार नाही. जखमेचे स्कॅन करण्यात आले आहे. मिशेल स्टार्कचा चेंडू जडेजाच्या ग्लोव्हजवर आदळला होता. यष्टिरक्षक ऋषभ पंतही जखमी झाला. दोघे फलंदाजी करू शकतील, मात्र जडेजाला गोलंदाजी करणे कठीण वाटत आहे.

तीन फलंदाज धावबाद
भारताने एकवेळ चार गड्यांच्या मोबदल्यात १९५ धावा केल्यानंतरही संपूर्ण संघ २४४ धावात बाद झाला.यजमान क्षेत्ररक्षकांची कामगिरी अफलातून अशीच होती. त्यामुळे हनुमा विहारी (४), आर. अश्विन (१०) आणि जसप्रीत बुमराह (००) हे धावबाद झाले.
 

साहाने केले यष्टिरक्षण
नियमित यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या डाव्या ढोपराला शनिवारी दुखापत झाल्यामुळे राखीव यष्टिरक्षक रिद्धिमान साहा याने ही जबाबदारी सांभाळली. कमिन्सच्या आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूलचा फटका मारताना पंतला ही दुखापत झाली. तो पट्टी बांधून दुसऱ्यांदा मैदानात आला खरा मात्र वेगवान धावा काढू शकला नाही.

ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ३३८, भारत पहिला डाव : रोहित शर्मा झे. आणि गो. हेजलवुड २६, शुभमन गिल झे. ग्रीन गो. कमिन्स ५०, चेतेश्वर पुजारा झे. पेन गो. कमिन्स ५०, अजिंक्य रहाणे त्रि. गो. कमिन्स २२, हनुमा विहारी धावबाद ४, ऋषभ पंत झे. वॉर्नर गो. हेजलवुड ३६, रवींद्र जडेजा नाबाद २८, रविचंद्रन आश्विन धावबाद १०, नवदीप सैनी झे. वेड गो. स्टार्क ४, जसप्रीत बुमराह धावबाद ००, मोहम्मद सिराज झे. पेनगो. कमिन्स ६,अवांतर: ८, एकूण : १००.४ षटकात सर्वबाद २४४ धावा. गोलंदाजी : १/ ७०,२/८५, ३/११७, ४/१४२, ५/१९५, ६/१९५, ७/२०६, ८/२१०, ९/२१६, १०/२४४. गोलंदाजी: स्टार्क १९-७-६१-१, हेजलवुड २१-१०-४३-२, कमिन्स २१.४-१०-२९-४, लियोन ३१-८-८७-०, लाबुशेन ३-०-११-०, ग्रीन ५-१-१२-०. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : डेव्हिड वॉर्नर पायचित गो. अश्विन १३, विल पुकोवस्की झे.साहा गो. सिराज १०, मार्नस लाबुशेन खेळत आहे ४७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे २९, अवांतर; ४, एकूण: २९ षटकात २ बाद १०३ धावा. गडी बाद क्रम: १/१६,२/३५. गोलंदाजी: बुमराह ८-१-२६-०, सिराज ८-२-२०-१, सैनी ७-१-२८-०, अश्विन ६-०-२८-१.

 

Web Title: Pujara's slow batting hits India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.