सिडनी : मार्नस लाबुशेन (नाबाद ६७ ) आणि विल पुकोव्हस्की (६२) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर गुरुवारी एसजीवर सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने वर्चस्व राखले आहे. दिवसअखेर यजमान संघाने दोन गड्यांच्या मोबदल्यात १६६ धावा केल्या. लाबुशेन आणि स्मिथ (नाबाद ३१) खेळत आहेत. भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि नवदीप सैनी यांना प्रत्येकी एकेक गडी बाद केला. सात षटकानंतर पावसाचा व्यत्यय आल्यामुळे जवळपास चार तासांचा खेळ वाया गेला. खेळाची वेळ वाढविण्यात आल्यानंतरही पहिल्या दिवशी ५५ षटकांचा खेळ होऊ शकला.
दुखापतीनंतर पुनरागमन करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला (५)सिराजने चौथ्या षटकात माघारी धाडले. मात्र, पदार्पण करणाऱ्या पुकोव्हस्कीने संयमी फलंदाजी केली. यष्टिरक्षक ऋषभ पंतने क्रमश: २६ आणि ३२ धावांवर झेल सोडून दिलेल्या दोन जीवदानाचा त्याने चांगलाच लाभ घेतला. शिवाय तो धावबाद होण्यापासूनही बचावला. पुकोव्हस्कीला लाबुशेनने उत्तम साथ दिली. दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी केली. अखेर पदार्पण करणाऱ्या सैनीने पुकोव्हस्कीला पायचीत करीत जोडी फोडली.
स्टीव्ह स्मिथने लाबुशेनबरोबर धावांची चांगली भर घातली. वन डे प्रमाणे दोघांनी फटकेबाजी केली. स्मिथने ऑफ आणि ऑन ड्राईव्ह फटकेबाजीचा अप्रतिम नमुना सादर केला. दरम्यान, लाबुशेनने कारकिर्दीतील नववे अर्धशतक साजरे केले. स्मिथ आणि लाबुशेन यांनी तिसऱ्या गड्यासाठी ६० धावांची नाबाद धावांची भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाची स्थिती भक्कम केली. यजमान संघाने पहिल्या दोन्ही कसोटीत केवळ २०० धावांचा पल्ला गाठला होता. ही खेळपट्टी फलंदाजांना अनुकूल वाटते. येथे धावडोंगर उभारण्याकडे ऑस्ट्रेलिया वाटचाल करू शकतो. भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. बुमराह, अश्विन आणि जडेजा अपयशी ठरले. भारताकडून सिराज-सैनीचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही. बुमराह, अश्विन आणि जडेजा अपयशी ठरले.
पावसाचा चार तास खोळंबापहिल्या दिवशी सात षटकांचा खेळ संपताच पावसाने हजेरी लावली. यामुळे जवळपास चार तासांचा खेळ वाया गेला. मैदान कर्मचाऱ्यांनी खेळ सुरू करण्यासाठी कठोर मेहनत घेत स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता मैदान खेळण्यायोग्य बनविले. पंचांनी खेळाचे तास वाढवून दिल्यानंतरही ५७ ऐवजी केवळ ५५ षटकांचाच खेळ होऊ शकला.
n सकाळी ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. दोन्ही संघांनी अंतिम एकादशमध्ये प्रत्येकी दोन बदल केले. भारताने मयांक अग्रवाल ऐवजी रोहित शर्माला आणि उमेश यादवच्या जागी नवदीप सैनीला स्थान दिले. ऑस्ट्रेलियाने ज्यो बर्न्सऐवजी वॉर्नरला आणि ट्रॅव्हिस हेडच्या जागी पुकोव्हस्कीला संधी दिली.धावफलक ऑस्ट्रेलिया (पहिला डाव)विल पुकोव्हस्की पायचित गो. सैनी ६२, डेव्हिड वॉर्नर झे. पुजारा गो. मोहम्मद सिराज ५, मार्नस लाबुशेन खेळत आहे ६७, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ३१. अवांतर : १. एकूण : ५५ षटकात २ बाद १६६ धावा. गडी बाद क्रम : १/६, २/१०६. गोलंदाजी : मोहम्मद सिराज १/४६, नवदीप सैनी १/३२.