Virender Sehwag Rahul Soreng, Pulwama Attack: १४ फेब्रुवारी २०१९ रोजी पुलवामा येथे दहशतवाद्यांनी CRPF जवानांना घेऊन जाणारी बस उडवली. त्यात ४० जवान शहीद झाले. त्या सैनिकांपैकी एक होते विजय सोरेंग. त्यांचा मुलगा आता वीरेंद्र सेहवागच्या मदतीने क्रिकेटर बनला आहे आणि आता त्याची हरयाणाच्या संघात निवडही झाली आहे. तो मुलगा म्हणजे राहुल सोरेंग, ज्याची विजय मर्चंट ट्रॉफीसाठी हरयाणा संघात निवड झाली. वीरेंद्र सेहवागने स्वतः ट्विट करून चाहत्यांना याची माहिती दिली. वीरेंद्र सेहवागने राहुल सोरेंगला क्रिकेटर म्हणून कसा घडवला आणि सेहवागने या १५ वर्षांच्या मुलाचे आयुष्य कसे बदलले ते जाणून घेऊया.
सेहवागने आपल्या शाळेत दिलं मोफत शिक्षण
पुलवामा हल्ल्यानंतर संपूर्ण देश शोकाकुल झाला आणि या हल्ल्यात ज्यांचे वडील शहीद झाले त्या राहुल सोरेंग याच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला. त्यावेळी राहुल फक्त १० वर्षांचा होता. वडिलांचा आधार गमावल्याने भविष्य कसे असेल, अशी चिंता त्याला सतावत होती. पण सेहवागच्या एका वचनाने त्याचे आयुष्य बदलले. पुलवामा हल्ल्यानंतर वीरेंद्र सेहवागने CRPF हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा केली होती. सेहवागने आपले वचन पूर्ण केले आणि राहुल सोरेंगला त्याच्या झज्जर येथील शाळेत प्रवेश दिला. राहुल सोरेंग हा सेहवाग इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे, जिथे या खेळाडूला मोफत शिक्षण आणि क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले.
राहुल सोरेंगची हरयाणा संघात निवड
राहुल सोरेंग आता १५ वर्षांचा असून त्याला विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये संधी मिळाली आहे. सेहवागचा मुलगाही या स्पर्धेत खेळला आहे. तो दिल्ली संघात आहे. राहुल सोरेंगची हरयाणा संघात निवड झाल्यावर सेहवागने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट टाकली. सेहवागने लिहिले की, राहुल सोरेंगचे नाव लक्षात ठेवा. ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम भावनांपैकी एक आहे. पुलवामा हल्ल्यानंतर, मी शहीदांच्या मुलांना मोफत शिक्षणाबद्दल बोललो होतो आणि मला अभिमान वाटतो की २०१९ मध्ये शहीद विजय सोरेंग यांचा मुलगा सेहवाग इंटरनॅशनल स्कूलमध्ये दाखल झाला. गेल्या चार वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे आणि आता त्याची हरयाणाच्या १६ वर्षांखालील संघात निवड झाली आहे.
राहुल सोरेंग हा स्फोटक फलंदाज आहे आणि सेहवागप्रमाणे तो सलामीवीर आहे. हा खेळाडू त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. आता विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये सोरेंग कशी कामगिरी करतो हे पाहायचे आहे.