झिम्बाब्वे संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकेकाळी दबदबा होता. सध्या आर्थिक चणचणीमुळे झिम्बाब्वेचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अस्तित्व जवळपास नाहीसं झाल्यात जमा झालं आहे. तरीही झिम्बाब्वेचे खेळाडू परिस्थितीवर मात देऊन मेहनत घेत आहेत. याचच एक उदाहरण म्हणजे झिम्बाब्वेचा फलंदाज रायन बर्ल यानं त्याच्या फाटलेल्या शूजचा फोटो ट्विट करुन मदतीचं आवाहन केलं होतं. याची दखल प्रसिद्ध स्पोर्ट्सब्रँड 'पूमा' कंपनीनं घेतली आणि मदतीची घोषणा केली आहे. (Puma comes forward with sponsorship after Zimbabwe cricketer posts photo of worn-out shoes)
२७ वर्षीय बर्ल या डावखुऱ्या फलंदाजानं झिम्बाब्वेसाठी ३ कसोटी, १८ एकदिवसीय आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. त्यानं नुकताच त्याच्या उसवलेल्या शूजचा फोटो ट्विट केला होता. गम आणि इतर गोष्टींनी झिम्बाब्वेच्या खेळाडूंना फाटलेल्या शूजवरच टाके मारुन वापरावे लागत आहेत. इतकी भयनाक परिस्थितीत संघाच्या खेळाडूंवर ओढावली आहे. बर्ल यानं त्याच्या ट्विटमध्ये कुणीतरी आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल आणि गम चिकटवून शूज वापरण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असं म्हटलं होतं. याची पूमा कंपनीनं तातडीनं दखल घेतली आणि मदतीसाठी धाव घेतली आहे.
"फाटलेल्या शूजला चिकटवण्याची वेळ आता संपलीय", असं ट्विट करुन 'पूमा' कंपनीनं झिम्बाब्वेच्या खेळाडूंना क्रिकेट कीटची मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
'पूमा' कंपनीच्या पुढाकाराबद्दल बर्ल यानंही कंपनीचे आभार व्यक्त केले आहेत. "मला सांगताना अतिशय आनंद होतोय की पूमा कंपनीनं मदत करण्याची तयारी दाखवली आहे आणि या कंपनीसोबत आता जोडलो गेलोय", असं बर्ल यानं म्हटलं आहे.