India vs Australia, Punam Raut: क्रिकेटला 'जेन्टलमन्स गेम' म्हणून ओळखलं जातं. खेळभावना जपत क्रिकेट खेळणं ही भारताची परंपरा राहिली आहे. भारतीय क्रिकेटचा वारसा जपत मराठमोळ्या पूनम राऊतनं ऑस्ट्रेलियात दौऱ्यात केलेल्या एका कृतीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सामन्यात पूनम बाद असूनही पंचांनी नाबाद दिलं होतं. पण पूनमनं मोठ्या मनानं मैदान सोडण्याचा निर्णय घेत कसोटी क्रिकेटची खेळ भावना जपली आणि भारतीयांचं क्रिकेटप्रती असलेलं जिव्हाळ्याचं नातं दाखवून दिलं आहे.
पूनम राऊतनं दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचं क्रिकेट विश्वात कौतुक केलं जात आहे. त्याचं झालं असं की ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या वहिल्या डे-नाइट कसोटीत सामन्याच्या ८१ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर पूनम राऊतनं ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू सोफी मोलिनेक्स हिचा फिरकी चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पूनमच्या बॅटची कडा घेत थेट यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ह्जमध्ये जाऊन विसावला. गोलंदाज आणि यष्टीरक्षकासह संपूर्ण संघानं पूनम बाद झाल्याची अपील पंचांकडे केली. पण पंचांनी पूनम नाबाद असल्याचा निर्णय दिला. पूनमनं यावेळी पंचांच्या निर्णयाचा विचार न करता खेळ भावना जपत चेंडूनं बॅटची कडा घेतल्याचं मान्य करत मैदान सोडण्याचा निर्णय घेतला. पूनमच्या कृतीनं सर्वच आश्चर्यचकीत झाले. सामन्याच्या समालोचकांनाही धक्का बसला. पूनमनं मैदानात १६५ चेंडू खेळून काढले होते. तिनं चांगला जम बसवला होता. तरीही खेळभावना जपत पूनमनं क्रिकेट जेन्टलमन्स गेम असल्याचं पुन्हा एकदा दाखवून दिलं. पूनमवर याबाबत कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानंही याची दखल घेत पूनमचा व्हिडिओ ट्विट केला आहे.
पूनम केलेल्या या कृतीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची सर्वांना आठवण झाली. सचिननंही अनेकदा मैदानात खेळभावना जपत गोलंदाजाला मान देत बाद झाल्यानंतर स्वत:हून मैदान सोडल्याचे प्रसंग आजवर क्रिकेट विश्वानं पाहिले आहेत. सचिनचा वारसा पूनमनं जपला अशाही प्रतिक्रिया सोशल मीडियात व्यक्त केल्या जात आहेत.