आयपीएल २०२२ मध्ये आतापर्यंत झालेल्या ७० सामन्यांमध्ये पंचांच्या कामगिरीचा दर्जा हा सुमार होता. अशावेळी संघांना डीआरएसचा आधार असतो. मात्र तोही अटीतटीच्या वेळी मिळाला नाही. एकूणच या गोष्टींचा जास्त फटका काही संघांना बसल्यामुळे त्यांना प्लेऑफची दावेदारी गमवावी लागली.
लखनौ आणि कोलकाता यांच्यात झालेल्या साखळी लढतीत जेव्हा रिंकू सिंगला बाद देण्यात आले. तेव्हा हा सामना पाहत असलेली माझी पत्नी लगेच म्हणाली, ‘अरे हा तर नो बॉल आहे.’ त्यावर मी तिला म्हटले की ‘हा जर ‘फ्रन्ट फूट’ नो बॉल असता तर तिसऱ्या पंचांनी तसा सायरन वाजविला असता.’ पण सामन्यानंतर जेव्हा समाजमाध्यमांवर यासंदर्भातील चर्चा आणि छायाचित्रे बघितली तेव्हा मीसुद्धा आश्चर्यचकित झालो. कारण रिंकू सिंगला चेंडू टाकताना स्टोईनिसचा पाय हा नियंत्रण रेषेच्या बाहेर होता.
पंचांची सुमार कामगिरी, डीआरएस याव्यतिरिक्त अजून एक गोष्ट आपण बघितली ती म्हणजे खेळाडूंनी दाखविलेला बालिशपणा किंवा उतावीळपणा. दिल्लीच्या दृष्टीने आत्यंतिक महत्त्वाच्या असलेल्या मुंबईविरुद्धच्या लढतीत मोक्याच्या क्षणी टिम डेविडच्या बॅटची कड घेऊन चेंडू कर्णधार ऋषभ पंतच्या हातात विसावला. तेव्हा दिल्लीकडून अपील करण्यात आले, पण पंचांनी ते फेटाळून लावले. अशावेळी दिल्लीने डीआरएसचा वापर करणे क्रमप्राप्त होते. मात्र तो न घेण्याची चूक दिल्लीला चांगलीच भोवली. कारण त्यानंतर डेविडने एकहाती सामना मुंबईच्या बाजूने फिरविला. महत्त्वाच्या सामन्यातील चुकीच्या निर्णयावर एक नजर...
स्निकोमीटरमुळे निर्णय चुकला
मुंबईविरुद्ध कोलकाता सामन्यामध्ये रोहितकडून साऊदीचा चेंडू मारण्याच्या नादात हुकला. त्यावेळी चेंडू बॅटच्या अगदी जवळून गेल्याने साऊदीने अपील केले. पंचांनी ते नाकारले. मात्र यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनने कर्णधार श्रेयसला डीआरएस घेण्याचा आग्रह केला. रिव्ह्यूमध्ये चेंडू आणि बॅट यामध्ये अंतर दिसत होते. पण त्याचवेळी चेंडू पॅडला लागत होता. त्यामुळे अल्ट्रा एज सरकल्याने स्निकोमीटरमध्येही काही हालचाल झाली. या सगळ्याचा परिणाम काय तर तिसऱ्या पंचांनी रोहितला २ धावावर बाद ठरविले.
‘अंपायर्स कॉल’चा विराटला बसला फटका
यंदाचा फारशी चमक न दाखवू शकलेला विराट मुंबईविरुद्धच्या सामन्यात मात्र ४८ धावांवर पूर्ण लयीत खेळत होता. त्यावेळी रोहितने गोलंदाजीत बदल करत डेवाल्ड ब्रेविस या कामचलाऊ फिरकी गोलंदाजाकडे चेंडू सोपवला. त्याने एका चेंडूवर विराटला पायचित पकडले आणि पंचांकडे दाद मागितली. त्यांनीही लगेच होकारार्थी मान डोलवत बोट वर केले. विराटने क्षणाचा विलंब न करता लागलीच डीआरएस घेतला. कारण त्याला खात्री होती की चेंडू आधी त्याच्या बॅटची कड घेऊन नंतर पॅडवर आदळला; पण तिसऱ्या पंचांना मैदानावरील पंचांचा निर्णय बदलविण्यासाठी कुठलाही ठोस पुरावा मिळाला नाही आणि त्यांनी विराटला बाद ठरवले.
पडिक्कलचा वादग्रस्त झेल
केन विल्यमसनचा पडिक्कलने घेतलेला झेल हा वादग्रस्त ठरला. कारण रिव्ह्यूमध्ये हे स्पष्टपणे दिसत होते की चेंडू आधी जमिनीला लागून मग पडिक्कलच्या हातात विसावला. तिसऱ्या पंचांना यावर निर्णय घेणे कठीण जात होते. कारण उपलब्ध चित्रफिती फारच अस्पष्ट होत्या. अखेर त्यांनी मैदानवरील पंचांचा बादचा निर्णयच कायम ठेवला.
वाईड बॉलमुळे स्टोईनिस निराश
सामना होता लखनौविरुद्ध आरसीबी. हाणामारीच्या षटकांमध्ये हेझलवूडचा सामना करण्यासाठी स्टोईनिस स्ट्राईकवर होता. लखनौला तेव्हा ३६ चेंडूत ७० धावांची आवश्यकता होती. १९ व्या षटकांत हेझलवूडने टाकलेला चेंडू स्पष्टपणे वाईड होता. पण पंचांनी मात्र तो वैध ठरवला. त्यावर स्टोईनिस चिडलादेखील. या घटनेमुळे त्याचे लक्ष विचलित झाले. कारण पुढचाच चेंडू मारण्याचा नादात तो बाद झाला. त्यात एक गोष्ट ठळकपणे जाणवली की स्टोईनिस आधीच्या चेंडूमुळे लक्ष विचलित होऊन नंतरच्या चेंडूवर बाद झाला.
नो बॉल ड्रामा
राजस्थान रॉयल्सविरुद्ध दिल्लीला अंतिम षटकात विजयासाठी ३६ धावा करायच्या होत्या. विशेष म्हणजे पॉवेलने ओबेद मॅकॉयच्या पहिल्या तीन चेंडूवर षटकार मारत दिल्लीच्या विजयी आशा पल्लवीतदेखील केल्या. यादरम्यान त्याने ज्या चेंडूवर तिसरा षटकार मारला तो मॅकॉयने पॉवेलच्या कंबरेच्या वर फेकलेला होता. पण पंचांनी तो काही नो बॉल दिला नाही. त्यावेळी डगआऊटमध्ये बसलेला पंत चांगलाच चिडला आणि त्याने खेळाडूंना परतण्याचा इशारा दिला. त्यामुळे काही काळ मैदानावर तणाव होता. पण खेळ सुरू होऊनही या चुकीच्या निर्णयाचा फटका दिल्लीला पराभवाने बसला. या सामन्यानंतर पंत, ठाकूर आणि सहायक प्रशिक्षक प्रवीण आमरे यांना दंड म्हणून त्यांच्या सामना शुल्कातील रकमेत कपात करण्यात आली. पण पंचांकडून मात्र त्यावर साधे स्पष्टीकरणही घेण्यात आले नाही. या घटनेवर मला अमीर कजलबाश यांचा एक शेर आठवतो आहे...
उसी का शहर, वही मुद्दई, वही मुंसिफ
हमें यकीन था हमारा कुसूर निकलेगा...
Web Title: Punch struck, DRS harassed in ipl 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.