- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी - पुण्यामध्ये २७ वर्षांनंतर क्रिकेट विश्वचषकाचे सामने होणार आहेत. १९ ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश सामना गहुंजेच्या एमसीए मैदानावर होणार आहे. मात्र, ऑनलाइन तिकीट मिळत नसल्याने क्रिकेट चाहते गहुंजे स्टेडियम परिसरात गर्दी करत आहेत. तिकिटे केवळ ऑनलाइन पद्धतीनेच उपलब्ध आहेत. नाराज चाहत्यांनी क्रिकेट सामन्यांची तिकिटे ब्लॅकने विकली जात असल्याचा आरोप करत थेट बीसीसीआय आणि एमसीएला प्रश्न विचारला आहे.
एमसीए क्रिकेट मैदानावर विश्वचषकाचे पाच सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये रंगणार आहे. त्यानंतर इतर सामने खेळवले जातील. भारत विरुद्ध बांगलादेश या क्रिकेट सामन्याचे तिकीट ऑनलाइन पद्धतीने न मिळाल्यामुळे अनेक चाहते नाराज आहेत.
ऑफलाइन तिकीट मिळते की नाही याची चौकशी करत आहेत. प्रत्यक्षात स्टेडियममध्ये तिकीट विक्री नाही. केवळ ऑनलाइन विक्री करण्यात येत आहे. परंतु, अनेक क्रिकेटप्रेमींनी तिकिटांचा काळा बाजार होत असल्याचा आरोप केला आहे. बाराशे रुपयांचे तिकीट दुप्पट-तिप्पट दराने विकले जात असल्याचा आरोप क्रिकेट चाहत्यांनी केला आहे.
ऑनलाइन तिकीट बुकिंगला मर्यादा का नाही?
क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी ऑनलाइन तिकीट बुकिंग करण्यात येत आहे. सुरुवातीला एकाच्या अकाउंटवरून दोनच तिकिटे बुक करता येत होती. मात्र, आता त्याला मर्यादा नसल्याने एका लॉगिनवरून कितीही तिकिटे बुक करता येतात. अशी ऑनलाइन तिकीट विक्री सुरू झाल्याबरोबर एजंटांनी तिकिटे बुक केली. त्यामुळे चाहत्यांना ती घेता आली नाहीत. त्यामुळे काहींनी जादा पैसे देऊन तिकिटे खरेदी केली.
बाराशेचे तिकीट अडीच हजाराला
या सामन्याचे तिकीट बाराशे रुपयांपासून सुरू आहे. मात्र, ऑनलाइन बुकिंग झाले नसल्याने काही जणांनी बाराशेचे तिकीट अडीच हजाराला खरेदी केले असल्याचे सांगितले.
आम्ही महिनाभरापूर्वी तिकीट बुक केले होते. त्यावेळी एका अकाउंटवरून दोनच तिकिटे बुक करता येत होती. नंतर त्यांनी त्याची मर्यादा वाढवली. त्यामुळे तीन तिकिटे खरेदी करता आली.
- गौरव बेडसे, क्रिकेटप्रेमी
Web Title: Pune: India-Bangladesh match ticket not available online! Allegation that Black was selling
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.