भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचे ८ संघ निश्चित झाले आहेत आणि उर्वरित दोन संघांसाठी पात्रता फेरी सुरू होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या सराव सामन्यांत सर्व संघांनी चांगलीच तयारी केल्याचे पाहायला मिळाले आहे. झिम्बाब्वे आणि ओमान यांच्यात झालेल्या सराव सामन्यात पंजाब किंग्जच्या फलंदाजाने आपल्या बॅटने तुफानी फटकेबाजी केली. आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणाऱ्या झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने ओमानविरुद्ध वादळी खेळी केली. रझाने आयपीएल २०२३मध्ये ७ सामन्यांत केवळ १३९ धावा केल्या होत्या, परंतु वर्ल्ड कप पात्रता स्पर्धेत धुमाकूळ घालायला तयार आहे.
ओमानविरुद्ध रझाने झंझावाती पद्धतीने शतक ठोकले. हा फलंदाज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला आणि रझाने ६७ चेंडूत ११० धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ७ चौकार आणि ७ षटकार मारले. त्याला दुखापत झाल्याने रिटायर हर्ट व्हावे लागले. झिम्बाब्वेने ५० षटकांत ६ बाद ३६७ धावा केल्या. रझा व्यतिरिक्त रायन बर्लने देखील ५२ चेंडूत ६८ धावांची खेळी केली.
ओमानने कडवी झुंज दिली आणि त्यांनी ३३९ धावांपर्यंत मजल मारली. ओमानकडून आकिब इलियासने १०४ चेंडूत ११५ धावा केल्या. अयान खाननेही ७६ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. रझाने ८ षटकांत ३ बळी घेत ओमानला बॅकफूटवर आणले. याशिवाय ब्रॅड इव्हान्सनेही ५.४ षटकांत ३ बळी घेतले.