IPL 2021: आयपीएलमध्ये भारतीय युवा खेळाडूंचा जलवा दरवर्षी पाहायला मिळतो. भारतीय युवा खेळाडूंसाठी आयपीएल हे एक सर्वोत्तम व्यासपीठ ठरतं. भारतीय संघाला देखील नवे खेळाडू याच स्पर्धेतून सापडतात. गेल्या सीझनपासून पंजाब किंग्जच्या अशाच एका युवा फिरकीपटूनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रवी बिश्नोईच्या फिरकी जादूनं अनेकांना भुरळ घातली आहे. पंजाब किंग्जचे प्रशिक्षक अनिक कुंबळे देखील लेग स्पीनर आहेत. रवी बिश्नोई त्यांच्याच मार्गदर्शनाखाली गोलंदाजीचे धडे घेत आहे. त्याचे परिणाम आयपीएलमध्येही पाहायला मिळत आहेत. बिश्नोईनं आपल्या फिरकीनं अनेक दिग्गज फलंदाजांना बाद केलं आहे. पण रवी बिश्नोईला नेमकं कोणत्या फलंदाजाला बाद करायला आवडेल किंवा आवडतं असं विचारलं असता त्यानं घेतलेलं नाव सर्वांना आश्चर्यचकीत करणारं आहे.
रवी बिश्नोईची ड्रीम विकेट कोणती असं विचारलं असता त्यानं कोणत्याही परदेशी क्रिकेटपटूचं किंवा भारताच्या विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांचं नाव घेतलं नाही. तर त्यानं मुंबई इंडियन्समधील सूर्यकुमार यादव याचं नाव घेतलं आहे. सूर्यकुमार यादवला बाद करणं हिच आपली ड्रीम विकेट आहे बिश्नोईनं म्हटलं आहे. यामागचं कारण देखील त्यानं सांगितलं आहे.
रवी बिश्नोईनं मुंबई इंडिन्स विरुद्धच्या सामन्यात दोन बळी घेतले. यात रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवचा समावेश होता. सूर्यकुमारची विकेट बिश्नोईसाठी खास होती असं त्यानं म्हटलं आहे.
"विराट कोहली, धोनी आणि रोहित शर्मा हे तर दिग्गज आहेत. त्यांची विकेट घेणं कुणाला आवडणार नाही? मी त्यांच्यासाठी देखील रणनिती आखली होती. या दिग्गजांची विकेट घेणं माझ्यासाठी खरंच भाग्यशाली ठरेल यात काहीच शंका नाही. पण माझ्यासाठी सूर्यकुमार यादवला बाद करणं खूप आव्हानात्मक राहिलं आहे. त्यामुळे त्याची विकेट मिळवणं मला फार दिलासा देणारं ठरतं", असं बिश्नोई म्हणाला.