Join us  

"मधली २ षटकं खराब पडली पण...", पराभवानंतर धोनीकडून युवा खेळाडूंची पाठराखण

MS Dhoni : पंजाब किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला त्यांच्या घरात पराभूत केले. 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 8:06 PM

Open in App

CSK vs PBKS । चेन्नई : शिखर धवनच्या (shikhar dhawan) पंजाब किंग्जने महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नईला त्यांच्या घरात पराभूत केले. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात पंजाबने बाजी मारली. शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना सिकंदर रझाने चेंडू सीमारेषेजवळ पाठवला आणि ३ धावा काढल्या. धोनीच्या चेन्नईला घरच्या मैदानावर २०० धावा करूनही पराभव पत्करावा लागला. लक्षणीय बाब म्हणजे पंजाबच्या संघाकडून एकाही फलंदाजाने अर्धशतकी खेळी केली नाही तरीदेखील विजय साकारला. सांघिक खेळीच्या जोरावर यजमान संघाला पराभूत करण्यात 'गब्बर'सेनेला यश आले. 

तत्पुर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ४ बाद २०० धावा केल्या. ऋतुराज गायकवाड (३७) आणि डेव्होन कॉनवे नाबाद (९२) धावांमुळे चेन्नईने तगडे आव्हान उभे केले होते. पण २०१ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांनी काही चुका केल्या ज्या संघाला चांगल्याच महागात पडल्या.

पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ४२ धावांची खेळी केली. तर लियाम लिव्हिंगस्टोन २४ चेंडूत ४० धावा करून तंबूत परतला. चेन्नईकडून तुषार देशपांडेने साजेशी गोलंदाजी करताना ३ बळी घेतले पण त्याने आपल्या ४ षटकांत तब्बल ४९ धावा दिल्या. याशिवाय रवींद्र जडेजा (२) आणि माथेशा पथिराणा (१) बळी घेण्यात यश आले. तुषार देशपांडेने लिव्हिंगस्टोन व जितेश जरी बाद केले असले तरी त्याने अखेरच्या षटकांत भरपूर धावा दिल्या अन् त्या CSKला महागात पडल्या.  

 धोनीकडून युवा खेळाडूंची पाठराखण पराभवाबद्दल बोलताना महेंद्रसिंग धोनीने म्हटले, "२०० धावांचे आव्हान सन्मानजनक होते पण आम्ही मधल्या काही षटकांमध्ये खराब गोलंदाजी केली, त्यामुळे अतिरिक्त धावा गेल्या. अखेरच्या षटकांमध्ये दबाव असतो तेव्हा बरोबर लाईन अन् लेन्थवर गोलंदाजी झाली नाही. पण पथिरानाने शानदार गोलंदाजी केली. आजची गोलंदाजी पाहून मी खुश आहे", अशा शब्दांत धोनीने युवा खेळाडूंची पाठराखण केली. मराठमोळ्या तुषारने आज ३ बळी घेऊन पर्पल कॅप पटकावली. तर श्रीलंकेच्या पथिराणाने १९वे षटक अप्रतिम टाकताना १,१LB,०,२,२,४ अशा धावा दिल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्समहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजा
Open in App