अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला धक्का दिल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेला पंजाब किंग्स संघ आता तुफान फॉर्ममध्ये असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला धडक देण्यास सज्ज झाला आहे. रविवारी रात्री होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघांकडून फिरकीचे युद्ध पाहण्यास मिळेल. दोन्ही संघांची फलंदाजी आणि गोलंदाजी मजबूत असल्याने चाहत्यांना तुल्यबळ लढतीचा आनंद मिळेल. मात्र, यंदाच्या सत्रातील दिल्लीचा सुरू असलेला धडाका पाहून पंजाबला विजयासाठी सर्वोत्तम खेळ करावा लागेल. पंजाबसाठी गेल्या सामन्यात हरप्रीत ब्रार विजयाचा शिल्पकार ठरला होता. त्याने कर्णधार विराट कोहलीसह ग्लेन मॅक्सवेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना बाद करून पंजाबचा विजय साकारला होता.
पृथ्वी तळपणार?दिल्लीने कोलकाताविरुद्ध सहज बाजी मारली ती पृथ्वी शॉच्या जोरावर. पृथ्वीने पहिल्याच षटकात मावीला सलग सहा चौकार मारत संघाच्या विजयाचा पाया रचला होता. त्यामुळे पृथ्वीच्या फटकेबाजीची उत्सुकता असेल.
फलंदाज फिरकीपटूंविरुद्ध भक्कम आहेत. पृथ्वीसह धवन, स्मिथ, पंत यांच्यावर दिल्लीची फलंदाजी अवलंबून आहे. मात्र, त्यांना पंजाबचा बिश्नोई आपल्या गुगलीच्या जोरावर अडचणीत आणू शकतो. दिल्लीसाठी गोलंदाज अमित मिश्रा महत्त्वाचा ठरू शकतो. तो अंतिम संघात खेळल्यास ललित यादव संघाबाहेर बसू शकतो. अक्षर पटेलच्या अष्टपैलू खेळामुळे दिल्ली संघ संतुलित बनत आहे.
कर्णधार लोकेश राहुल आणि ख्रिस गेल यांची फलंदाजी पंजाबसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या दोघांनी गेल्या सामन्यात पंजाबसाठी मोलाचे योगदान दिले होते. मात्र राहुलचा अपवाद वगळता पंजाबच्या कोणत्याही फलंदाजाला सातत्य राखता आलेले नाही. वेगवान गोलंदाजीत मोहम्मद शमी प्रभावी ठरत असून त्याला इतर गोलंदाजांकडून साथ मिळणे आवश्यक आहे.