आयसीसीने भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतातील विविध दहा शहरांमध्ये स्पर्धेचे सामने खेळवले जाणार आहेत. तब्बल १२ वर्षानंतर भारतात वन डे विश्वचषक होत असून भारतीयांना आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची आशा आहे. अशातच सामन्यांच्या ठिकाणावरून चांगलेच राजकारण तापल्याचे दिसते. पंजाबचे क्रीडा मंत्री गुरमीत सिंह मीत हेयर यांनी मोहालीमध्ये सामना नसल्याबद्दल आक्षेप घेतला असून ते बीसीसीआयकडे याची तक्रार करणार आहेत.
आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३च्या यजमान शहरांच्या यादीतून मोहालीला वगळल्याचा त्यांनी निषेध केला. तसेच पंजाबच्या मोहालीला स्पर्धेसाठी यजमान शहरांच्या यादीतून वगळणे हे केवळ राजकीय हस्तक्षेपामुळे झाले आहे. त्यामुळे पंजाब सरकार हा मुद्दा बीसीसीआयकडे उपस्थित करणार असल्याचे त्यांनी सांगितले. खरं तर हैदराबाद, अहमदाबाद, धर्मशाला, दिल्ली, चेन्नई, लखनौ, पुणे, बंगळुरू, मुंबई आणि कोलकाता या ठिकाणी विश्वचषकाचे सामने खेळवले जाणार आहेत.
दरम्यान, १० वर्षांच्या आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. आज आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले असून ५ ऑक्टोबरपासून थरार रंगणार आहे. स्पर्धेतील सलामीचा सामना २०१९च्या विश्वचषकातील फायनलिस्ट न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात होणार आहे. तीन दिवसानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपल्या अभियानाची सुरुवात करेल. उपांत्य फेरीचे सामने १५ व १६ नोव्हेंबर रोजी खेळवले जाणार आहेत. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होईल.
विश्वचषकातील भारताचे सामने -
- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ८ ऑक्टोबर, चेन्नई
- भारत विरुद्ध अफगाणिस्तान,११ ऑक्टोबर, दिल्ली
- भारत विरुद्ध पाकिस्तान, १५ ऑक्टोबर, अहमदाबाद
- भारत विरुद्ध बांगलादेश, १९ ऑक्टोबर, पुणे
- भारत विरुद्ध न्यूझीलंड, २२ ऑक्टोबर, धर्मशाला
- भारत विरुद्ध इंग्लंड, २९ ऑक्टोबर, लखनौ
- भारत विरुद्ध क्वालिफायर, २ नोव्हेंबर, मुंबई
- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ५ नोव्हेंबर, कोलकाता
- भारत विरुद्ध क्वालिफायर, ११ नोव्हेंबर, बंगळुरू