ललित झांबरेचेन्नईकडून(CSK) पराभवानंतर आयपीएल 2020 (IPL 2020)मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबचे (KingsXIPunjab) आव्हान संपले आहे. शेवटच्या सामन्यापर्यंत ते स्पर्धेत होते पण पहिल्याच सामन्यात जो 'शॉर्ट रन' त्यांना भारी पडला त्याची किंमत शेवटी चुकवावी लागली. 20 सप्टेंबरला जेंव्हा दिल्लीविरुध्दच्या (DC) सामन्यात पंच नितीन मेनन यांच्याकडून शॉर्टरनची (Short run) ही चूक घडली होती तेंव्हाच ही चूक पंजाबला महागात पडू शकते अशी भीती व्यक्त करण्यात आली होती आणि ती खरी ठरली.
त्या सामन्याच्या 19 व्या षटकात पंच नितीन मेनन यांनी ख्रिस जॉर्डनने क्रीझच्या आत बॅट टेकवली नसल्याचे कारण देत पंजाबची ही धाव अवैध ठरवली होती. मात्र टेलिव्हिजन रिप्लेंमध्ये ती धाव वैध होती हे स्पष्ट दिसले. ही धाव पंजाबला मिळाली असती तर तो सामना 'टाय' राहिला नसता आणि नियोजीत वेळेतच पंजाबने जिंकला असता. पण दुर्देवाने ती धाव पंजाबला नाकारली गेली आणि सामना सुपर ओव्हरमध्ये गेल्यावर कसिगो रबाडाने दिल्लीसाठी विजय खेचून आणला होता. त्या गमावलेल्या दोन गुणांची किंमत किंग्स इलेव्हनला प्ले ऑफमधील स्थानाने चुकवावी लागली आहे.
पंजाबचा कर्णधार के.एल. राहुल यानेसुध्दा आपला संघ बाहेर झाल्यावर सर्वप्रथम हा शॉर्ट रनचाच मुद्दा उपस्थित केला आहे. मात्र त्यासोबतच त्याने काही आवाक्यातले सामने गमावणेही महागात पडल्याचे म्हटले आहे.
राहुल म्हणतो, "बरेच काही होऊ शकले असते. काही सामने आम्ही जिंकण्याच्या स्थितीत होतो पण आम्ही ती संधी गमावली. त्याचा दोष आम्ही स्वीकारायलाच हवा. सुरुवात पहिल्या सामन्यापासूनच झाली. तो शॉर्ट रन आम्हाला शेवटी फार महागात पडला. मात्र आयुष्यात चुका होत असतात. सर्वच जण चूका करतात. यंदाच्या मोसमात आम्ही चूका केल्या. त्या मान्य करायला हव्या आणि त्यापासून धडा घ्यायला हवा.
किंग्स इलेव्हनने त्यांच्या पहिल्या सातपैकी सहा सामने गमावले होते. पण त्यानंतर त्यांनी ओळीने पुढचे पाच सामने जिंकले आणि प्ले ऑफच्या स्पर्धेत ते आले होते. मात्र शेवटच्या दोन सामन्यात राजस्थान व चेन्नईकडून पराभवाने त्यांचे आव्हान संपवले.