बुकी किंवा पंटरच क्रिकेटपटूंना सामन्यातील अंतर्गत माहितीसाठी संपर्क साधतात असे नाही.. काहीवेळा सामान्य व्यक्तीही भारतीय क्रिकेटपटूंना संपर्क साधून अंतर्गत माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. असाच एक विचित्र प्रकार भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज ( India pacer Mohammed Siraj ) याच्यासोबत घडला आहे. एक व्यक्ती बेटिंगमध्ये भरपूर पैसे गमावून बसला अन् त्याने मदतीसाठी सिराजला संपर्क साधला. हैदराबादच्या २९ वर्षीय या व्यक्तीबाबत सिराजने लगेचच बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाला कळवले. त्यानंतर त्या व्यक्तीला चौकशीसाठी पकडण्यात आले.
''त्या तरुणाने सिराजला व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवला आणि बेटिंगमध्ये आपण पैसे गमावल्याचे त्याने सांगितले. त्याने सिराजकडे मदतीची मागणी केली. सिराजने याची माहिती बीसीसीआयला दिली,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने न्यू इंडियन एक्स्प्रेसला सांगितले. ते पुढे म्हणाले,''आरोपी कोणत्याही टोळीशी संबंधित नाही किंवा त्याच्याकडे सट्टेबाजीचे पूर्वीचे रेकॉर्डही नाही. त्याने सामन्यांवर सट्टेबाजी करताना बरेच पैसे गमावले आणि सिराज त्याला या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करेल अशी आशा त्याला होती. आम्ही सायबर पोलिसांची मदत घेतली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याचा फोनही निरीक्षणाखाली ठेवला. अखेरीस, आम्ही त्याचा शोध घेतला. तो आंध्रमध्ये कुठेतरी पकडला गेला तेव्हा आमचे अधिकारी स्थानिक पोलिसांसोबत होते."
ही घटना सध्या सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या आधी झालेल्या भारत-ऑस्ट्रेलिया वन डे मालिकेदरम्यान घडल्याची माहिती सूत्राने दिली.
आयपीएल २०२३ शी या घटनेशी काही संबंध नाहीया आयपीएलमध्ये आतापर्यंत एकाही खेळाडू किंवा सपोर्ट स्टाफला बुकींनी संपर्क साधला नाही, असे सूत्राने सांगितले. "आयपीएलमध्ये आतापर्यंत असा कोणताही प्रकार घडलेला नाही. खेळातील सर्व भागधारकांना शिक्षित करण्यावर भर दिला जात आहे. आमच्याकडे प्रशिक्षित अधिकारी आहेत जे खेळाडूंना शिक्षित करण्यासाठी वर्ग घेतात. केवळ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ शिक्षित नाहीत, तर संघ व्यवस्थापक आणि सामना अधिकारी त्यांनाही शिक्षण दिले जाते. आम्ही प्रवर्तकांना लूपमध्ये ठेवतो आणि आम्ही राबवत असलेल्या शैक्षणिक कार्यक्रमांचे तपशील त्यांना पाठवतो,''असेही सूत्रांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"