IPL 2022, Chennai Super Kings vs Delhi Capitals Live Updates : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात चेन्नई सुपर किंग्स कमबॅक करताना दिसतोय... दिल्ली कॅपिटल्सवर त्यांनी रविवारी ९१ धावांनी विजय मिळवला, आयपीएल २०२२मधील हा धावांच्या बाबतीतला सर्वात मोठा विजय ठरला. चेन्नईने विजयासाठी ठेवलेल्या २०८ धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संपूर्ण संघ ११७ धावांत तंबूत परतला. या विजयासोबत CSKने ८ गुणांसह आठवे स्थान पटकावले आहे, तर DC च्या प्ले ऑफच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे. या विजयानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) चेन्नईचे प्ले ऑफमधील चान्स कितीय, हे विचारले गेले आणि त्याने मजेशीर उत्तर दिले.
सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( ४१) व डेवॉन कॉनवे ( ८७) यांनी ११० धावांची भागीदारी करून CSKसाठी मजबूत पाया रचला. शिवम दुबेने ( ३२) व महेंद्रसिंग धोनी ( २१*) यांनी फटकेबाजी करून संघाला ६ बाद २०८ धावा गाठून दिल्या. एनरिच नॉर्खिया ( ३-४२) व खलिल अहमद ( २-२८) यांनी चांगली गोलंदाजी केली. प्रत्युत्तरात, मोईन अलीने सामन्याला कलाटणी दिली. दिल्लीच्या ३ फलंदाजांना १३ धावांवर माघारी पाठवून त्याने चेन्नईचा विजय पक्का केला. मिचेल मार्श ( २५), रिषभ पंत ( २१) व रिपल पटेल ( ६) या तीन महत्त्वाच्या विकेट्स त्याने घेतल्या. शार्दूल ठाकूर ( २४) दिल्लीकडून सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला. मुकेश चौधरी ( २-२२), सिमरजीत सिंग ( २-२७) व ड्वेन ब्राव्हो ( २-२४) यांनीही सुरेख कामगिरी केली.
प्ले ऑफबाबत धोनी काय म्हणाला?
माझं गणित एवढं चांगलं नाही. तुम्ही स्वतः स्वतःचं नशीब लिहीत असता. जेव्हा अन्य संघ चांगले खेळत असताना दडपण घेण्यात काहीच गरज नाही. आयपीएलचा आनंद घ्या आणि उर्वरित ३ सामन्यांत हेच महत्त्वाचे आहे. जर तुम्ही यंदा प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयशी ठरलात, तर त्याने जगाचा अंत होणार नाही. पुढच्या वर्षीचं प्लानिंग आतापासून करा, असे धोनीने स्पष्ट केले.
चेन्नई सुपर किंग्सला अजूनही आहे संधी ( Qualification scenario for CSK )- चेन्नईने त्यासाठी उर्वरित तीनही सामने जिंकायला हवेत- कोलकाता नाईट रायडर्सने एक सामना गमवल्यास त्यांचे आव्हान संपुष्टात- रॉयल चलेंजर्स बंगळुरूने उर्वरित दोन्ही लढती गमवायला हव्यात- पंजाब किंग्सने RCB ला हरवायला हवं आणि उर्वरित दोन्ही सामने गमवायला हवेत- दिल्ली कॅपिटल्स व सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्सला पराभूत करायला हवेत आणि त्यानंतर स्वतःच्या उर्वरित दोन लढती गमवायला हव्यात