मुंबई इंडियन्सचा संघ इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारा पहिला संघ ठऱला. मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ५ बाद २०० धावांचा पाठलाग करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) फलंदाजांना जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) आणि ट्रेंट बोल्ट ( Trent Boult) यांनी शरणागती पत्करण्यास भाग पाडले. DCला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. MIने ५७ धावांनी हा सामना जिंकून सहाव्यांदा IPLच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. याआधी २०१० वगळता मुंबई इंडियन्सनं २०१३, २०१५, २०१७ व २०१९मध्ये जेतेपद पटकावले. पण, या सामन्यात पहिल्याच षटकात दोन विकेट्स घेणारा ट्रेंट बोल्ट दुखापतीमुळे दोन षटकं टाकून माघारी परतला. त्याच्या दुखापतीनं मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांची चिंता वाढवली.
रोहित शर्मा, किरॉन पोलार्ड शून्यावर बाद होऊनही मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians)च्या अन्य फलंदाजांनी धमाकेदार खेळ केला. क्विंटन डी'कॉक ( ४०), सूर्यकुमार यादव ( ५१), इशान किशन ( ५५*) आणि हार्दिक पांड्या ( ३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं ५ बाद २०० धावांचा डोंगर उभा केला. हार्दिकनं १४ चेंडूंत ५ षटकारांसह नाबाद ३७ धावा केल्या, इशाननं ३० चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. या दोघांनी अखेरच्या षटकांत तुफान फटकेबाजी केली.
मुंबईनं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा भार दिल्लीचे आघाडीचे फलंदाज पेलवू शकले नाही. ट्रेंट बोल्टच्या पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणे बाद झाले. त्यानंतर जसप्रीत बुमराहनं दुसऱ्या षटकात शिखऱ धवनला बाद केले. दिल्लीचे आघाडीचे तीनही फलंदाज भोपळाही फोडू शकले नाही. कर्णधार श्रेयस अय्यरला ( १२) बाद करून बुमराहनं दिल्लीची अवस्था ४ बाद २० धावा अशी दयनीय केली. त्यानंतर कृणाल पांड्यानं DCच्या रिषभ पंतला ( ३) बाद करून त्यांची अवस्था ५ बाद ४१ अशी केली.
मार्कस स्टॉयनिस तंबू ठोकून बसला आणि त्यानं अर्धशतकी खेळी करताना अक्षर पटेलसह सहाव्या विकेटसाठी ५०+ धावा जोडल्या. स्टॉयनिस ६५ धावांवर माघारी परतला. अक्षर पटेलनं ४२ धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त दिल्लीच्या फलंदाजांनी निराश केलं. बुमराहनं ४ षटकांत १ निर्धाव षटकासह १४ धावांत ४ विकेट्स घेतल्या. दिल्लीला २० षटकांत ८ बाद १४३ धावा करता आल्या. पण, या सामन्यात ( २/९) दमदार सुरुवात करून देणारा ट्रेंट बोल्टनं मांडीचा सांधा दुखल्यानं मैदान सोडले. त्यानं केवळ दोनच षटकं फेकली.
सामन्यानंतर
रोहित शर्मा म्हणाला,''मी अजून ट्रेंटला पाहिलेले नाही, परंतु तो बरा असेल याची मला खात्री आहे. आता मोठा सामना आमच्यासमोर आहे आणि त्या सामन्यात ट्रेंट मैदानावर उतरण्यासाठी फिट होईल, ही आमची इच्छा आहे. मला खात्री आहे तो १० तारखेला मैदानावर दिसेल. त्याच्याकडे विश्रांतीसाठी तीन दिवस आहेत. तुमच्याकडे जसप्रीत बुमराह सारखा गोलंदाज असेल, तर तुमचं आयुष्य एकदम सोपं होतं. बुमराह व बोल्ट चांगल्या फॉर्मात आहे. या दोघांनाही सलाम.''
Web Title: Qualifier 1, MI vs DC : Trent Boult is off the field with a groin strain; Rohit Sharma give updates of his injury
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.