Indian Premier League ( IPL 2020)च्या १३व्या पर्वात सातत्यपूर्ण कामगिरी करून प्ले ऑफमध्ये प्रवेश करणाऱ्या सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघानं क्वालिफायर २ सामन्यात दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) विरुद्ध सर्वांना निराश केलं. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व फलंदाजी या तीनही आघाड्यांवर SRHचे खेळाडू अपयशी ठरले. याउलट आज DCचा खेळ उजवा झाला. शिखर धवन, मार्कस स्टॉयनिस, शिमरोन हेटमायर यांच्यानंतर कागिसो रबाडा, स्टॉयनिस यांनी गोलंदाजीत आपली छाप पाडताना DCला पहिल्यांदा फायनलमध्ये प्रवेश मिळवून दिला. केन विलियम्सन व अब्दुल समद यांनी संघर्ष करताना सामन्यातील चुरस कायम राखली होती, परंतु त्यांना अपयश आलं.
दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पृथ्वी शॉच्या जागी संघात अजिंक्य रहाणेला संधी दिली. पृथ्वीच्या अनुपस्थितीत अजिंक्य व शिखर धवन हे सलामीला येतील अशी अपेक्षा होती, परंतु कर्णधार श्रेयस अय्यरनं गब्बरसह सलामीला मार्कस स्टॉयनिसला पाठवून मोठा डाव खेळला. DCची ही खेळी यशस्वी ठरली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावा चोपल्या. राशिद खाननं SRHला पहिलं यश मिळवून दिलं. स्टॉयनिस ३८ धावांवर त्रिफळाचीत झाला. पण, धवन दुसऱ्या बाजूनं दमदार खेळ सुरूच ठेवला. त्यानं २६ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं. चांगल्या सुरुवातीमुळे दिल्ली कॅपिटल्सच्या अन्य फलंदाजांचाही आत्मविश्वास उंचावलेला दिसला.
अय्यर-धवन जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. जेसन होल्डरनं ही जोडी तोडली. अय्यर २१ धावांवर माघारी परतला. आज हैदराबादच्या खेळांडूकडून क्षेत्ररक्षणातही चुका झाल्या. त्याचाच फायदा आज दिल्लीच्या फलंदाजांनी पुरेपूर उचलला. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हादरवून सोडणाऱ्या जेसन होल्डरचीही DCनं धुलाई केली. बढती मिळालेल्या शिमरोन हेटमायरनंही चांगले हात धुऊन घेतले. होल्डरच्या चार षटकांत DCच्या फलंदाजांनी ५० धावा कुटल्या. संदीप शर्मानं १९व्या षटकात धवनला ( ७८ धावा, ६ चौकार व २ षटकार) बाद केले. त्यानं हेटमायरसह तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हेटमायर २२ चेंडूंत ४२ धावांवर नाबाद राहिला. दिल्लीनं ३ बाद १८९ धावा केल्या.
आज SRHची सर्वच बाजूनं कोंडी झाली. कागिसो रबाडानं दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर डेव्हिड वॉर्नरचा त्रिफळा उडवून DCला मोठं यश मिळवून दिलं. प्रियाम गर्ग व मनीष पांडे यांनी थोडावेळ खिंड लढवली, परंतु स्टॉयनिसनं या दोघांना एकाच षटकात बाद करून SRHची अवस्था ३ बाद ४४ धावा अशी केली. एलिमिनेटर सामन्यातील जबरदस्त जोडी केन विलियम्सन व जेसन होल्डर याही सामन्यात SRHला तारतील असे वाटले होते, परंतु अक्षर पटेलनं त्यांना धक्का दिला. होल्डर 11 धावांवर माघारी परतला. पण, केनला रोखणं दिल्लीला शक्य झाले नाही. आतापर्यंत SRHसाठी अनेकदा तारणहार ठरलेल्या केननं आणखी एक अर्धशतकी खेळी करताना सामन्यातील रंगत कायम ठेवली होती. त्यानं अब्दुल समदला सोबतीला घेऊन 27 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली.