भारतीय संघ आशिया चषक आणि वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सज्ज होतोय. आशिया चषक स्पर्धेसाठीचा संघ नुकताच जाहीर केला अन् याच १७ जणांपैकी अनेकांना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. शुबमन गिल आणि रोहित शर्मा ही नवी जोडी भारताच्या सलामीची जबाबदारी सक्षमपणे सांभाळली आहे. सध्याचा भारतीय संघ हा युवा व अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ असलेला संघ आहे. पण, या संघात युवा खेळाडूंना सीनियर्स दडपण वाटत नाही, तर खेळीमेळीचं वातावरण आहे आणि याची प्रचिती देणारा प्रसंग काल मुंबईत घडला.
काल मुंबईत CEAT पुरस्कारांचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी शुबमन गिल याला वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटूच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय शुबमनला वर्षातील सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फलंदाज आणि वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज असे दोन पुरस्कारही प्रदान करण्यात आले. आंतरराष्ट्रीय गोलंदाजाचा पुरस्कार टीम साऊदीने पटकावला, तर कसोटीतील सर्वोत्तम फलंदान केन विलिय्मसन ठरला. सूर्यकुमार यादव आणि भुवनेश्वर कुमार हे अनुक्रमे ट्वेंटी-२०तील सर्वोत्तम फलंदाज व गोलंदाज पुरस्काराचे मानकरी ठरले. श्रीलंकेचा प्रभात जयसूर्या व ऑस्ट्रेलियाचा अॅडम झम्पा हे अनुक्रमे कसोटी व वन डेतील सर्वोत्तम गोलंदाज ठरले. दीप्ती शर्माने महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पटकावला.
यावेळी शुबमन गिल म्हणाला, ''सचिन तेंडुलकर यांना मी माझा आदर्श मानतो. मला कर्णधार व प्रशिक्षकांकडून खूप सहकार्य मिळालं.'' यावेळी शुबमनला काही मजेशीर प्रश्नही विचारण्यात आले आणि त्यावर रोहित भाई हा चांगला डान्सर आहे आणि लवकरच आपल्याला रिल्स पाहायला मिळेल, असे तो म्हणाला. स्पायडर मॅनच्या एका चित्रपटाला शुबमनने आवाज दिला आहे आणि संघातील कोणत्या खेळाडू हा कोणत्या सुपरहिरोसारखा आहे असे त्याला विचारले गेले. यावेळी त्याने विराट कोहली हा खूप आक्रमक आहे आणि त्याला Hulk हा सूट होईल. तर रोहित हा कॅप्टन अमेरिकासारखा असल्याचे सांगितले.