काल दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेला दुसरा टी-२० सामना हा सर्वार्थाने रेकॉर्डब्रेक ठरला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या सर्वात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विश्वविक्रमी विजयाची नोंद केली. या सामन्यात वेस्ट इंडिजने दिलेल्या २५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर क्विंटन डी कॉकने केलेली वादळी शतकी खेळी दक्षिण आफ्रिकेच्या विजयात निर्णायक ठरली होती. त्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे लक्ष्य १९ व्या षटकातच गाठले.
दरम्यान, ४४ चेंडूत १०० धावांची खेळी करणाऱ्या क्विंटन डी कॉकने या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले. क्विंटन डी कॉक हा आंतरराष्ट्रीय टी-२० सोबतच एकदिवसीय, कसोटी, अंडर-१९ कसोटी, अंडर-१९ एकदिवसीय आणि अंडर-१९ टी२० मध्ये शतक ठोकण्याचा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज ठरला आहे. क्विंटन डि कॉकशिवाय असा कारनामा कुठल्याही खेळाडूला करता आलेला नाही. सध्यातरी अशी कामगिरी करणारा क्विंटन डी कॉक हा क्रिकेटमधील एकमेव फलंदाज आहे.
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेने तुफानी फलंदाजी करत २५९ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत नव्या विश्वविक्रमाची नोंद केली होती. या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना जॉन्सन चार्ल्सच्या शतकी खेळीच्या जोरावर २० षटकांत २५८ धावा कुटल्या. मात्र क्विंटन डी कॉक आणि रीझा हेंड्रिक्स यांच्या वादळी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान १८.५ षटकांतच पार केले. लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवला गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला. तर आज शतकी खेळीदरम्यान, क्विंटन डी कॉकने १५ चेंडूतच अर्धशतक पूर्ण केले. दक्षिण आफ्रिकेकडून केली गेलेली ही सर्वात वेगवान अर्धशतकी खेळी ठरली.