यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप हा भारतामध्ये खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघा विजयाचा मोठा दावेदार म्हणून उतरणार आहे. यादरम्यान, एका खेळाडूचं असं वक्तव्य समोर आलं आहे, ज्याने कुटुंबासह वेळ घालवण्यासाठी आपल्या देशाच्या क्रिकेट बोर्डाला मध्यवर्ती करारातून मुक्त करण्यास सांगितले होते. मात्र आता तो पुन्हा एकदा देशासाठी वर्ल्डकप खेळू इच्छित आहे. या खेळाडूचं नाव आहे ट्रेंट बोल्ट.
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने सांगितले की, तो पुन्हा एकदा आपल्या देशाकडून खेळू इच्छितो. त्याने सांगितले की, यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये मला देशासाठी विश्वचषक जिंकायचा आहे. न्यूझीलंडचा संघ गेल्या बऱ्याच काळापासून मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील चांगला संघ राहिला आहे. आता आयसीसी ट्रॉफी आपल्या नावे करण्याची वेळ आली आहे.
ट्रेंट बोल्टने गेल्यावर्षी आपल्याला मध्यवर्ती करारातून मुक्त करण्याची विनंती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडे केली होती. बोर्डानेही ही विनंती मान्य केली होती. त्यावेळी कुटुंबाला वेळ देण्यासाठी आणि देशोदेशीच्या लीग खेळण्यासाठी आपण करारातून मुक्त होत असल्याचे बोल्टने सांगितले होते.
मात्र ३३ वर्षीय बोल्टने आता पुन्हा एकदा न्यूझीलंडकडून खेळायची इच्छा व्यक्त केली आहे. वर्ल्डकप जवळ येतोय आणि मी माझ्या देशासाठी ही ट्रॉफी जिंकण्यासाठी मी उत्सुक आहे, अनेक वर्षांपासून आम्ही या स्वप्नाच्या जवळ पोहोचून अपयशी ठरत आहोत. त्यामुळे हे स्वप्न अपूर्ण आहे. यावेळी आम्ही अवश्य यशस्वी ठरू. माझ्यामध्ये अजून बरेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट शिल्लक आहे.