IPL 2022 स्पर्धेत अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने मंगळवारी शानदार कामगिरी करत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामन्यात त्याने ३ बळी टिपत आपल्या संघाला मोठा विजय मिळवून दिला. अश्विनने या सामन्यात ४ षटके टाकली आणि अवघ्या १७ धावांत ३ महत्त्वाचे बळी टिपले. अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्याने बंगलोरची मधली फळी उद्ध्वस्त केली. या सामन्यात अश्विनने प्रथम रजत पाटीदारला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर शाहबाज अहमद आणि सुयश प्रभुदेसाई या दोघांनाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या दोन्ही फलंदाजांचे झेल रियान परागने टिपले. यासह अश्विनने आयपीएलच्या इतिहासात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
आर अश्विनने आपल्या अनुभवाच्या जोरावर IPL कारकिर्दीत १५० बळींचा टप्पा पूर्ण केला. ही कामगिरी करणारा अश्विन हा IPL लीगमधील केवळ आठवा गोलंदाज ठरला. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण IPL च्या १५ वर्षांच्या इतिहासात हा टप्पा गाठणार अश्विन केवळ दुसरा ऑफस्पिनर गोलंदाज ठरला. या आधी केवळ हरभजनने ही कामगिरी केली होती.
RCB विरुद्धच्या सामन्यातील ३ बळींनंतर अश्विनचे आता IPLमध्ये १५२ बळी झाले. त्याने आतापर्यंत १७५ सामने खेळले आहेत. अश्विनचा इकॉनॉमी रेट ६.९३ आहे. आतापर्यंत IPLच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत १५९ सामन्यात १८१ विकेट्स घेतल्या आहेत. तर अमित मिश्रा हा IPLमध्ये सर्वाधिक १६६ विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज आहे.
Web Title: R Ashwin becomes second off spinner to achieve big feat in IPL 2022 RR vs RCB match takes 150 wickets see records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.