T20 World Cup : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपविण्यासाठी सज्ज झाला आहे. आशिया चषक २०२२ स्पर्धेत भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांच्या येण्याने संघ मजबूत झाला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत यांच्याकडून देशवासियांना भरपूर अपेक्षा आहेत. अष्टपैलू रवींद्र जडेजाने दुखापतीमुळे वर्ल्ड कप खेळण्याची संधी गमावली. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या वर्ल्ड कपनंतर विराट व जडेजा यांच्या ट्वेंटी-२० संघातील स्थानावर अनिश्चितता आहे. विराटची कामगिरी कशी होते, यावर सारं गणित अवलंबून आहे. पण, या दोघांव्यतिरिक्त भारतीय संघातील तीन खेळाडूंसाठी हा अखेरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप असणार आहे.
भारतीय संघात अनुभवी व युवा खेळाडूंची योग्य सांगड घातली गेली आहे. रोहित, विराट, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार , दिनेश कार्तिक हे तीशी पार आहेत. त्यामुळे यंदाचा वर्ल्ड कप हा त्यांच्यासाठी शेवटची संधी असू शकते.
आर अश्विन - कसोटी स्पेशालिस्ट असलेल्या आर अश्विनने जबरदस्त कामगिरी करताना पुन्हा एकदा ट्वेंटी-२० संघात आपले नाणे खणखणीत वाजवले. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात पात्र ठरला. पण, पस्तीशीपर्यंत पोहोचलेला अश्विन पुढील ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्याची शक्यता फार कमीच आहे. रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्थी, राहुल चहर इत्यादी फिरकीपटू संधीची वाट पाहत आहेत.
भुवनेश्वर कुमार - ३२ वर्षीय भुवनेश्वर कुरमाला दुखापतीमुळे क्रिकेटला बऱ्याच वेळा मुकावे लागले. फिटनेस ही त्याच्याबबतची मोठी समस्या आहे. आजही तो ट्वेंटी-२० मधील प्रमुख गोलंदाज आहे आणि यात शंका नाही. पण, पुढील वर्ल्ड कप २०२४ मध्ये होणार आहे आणि भुवी संघात असण्याची शक्यता कमी आहे. दीपक चहर, आवेश खान, उम्रान मलिक, प्रसिद्ध कृष्ण इत्यादी आपल्या कामगिरीने भुवीवर दडपण निर्माण करत आहेतच. मोहम्मद शमीने युवा गोलंदाजांसाठी वाट मोकळी करण्याचं धाडस दाखवलं.
दिनेश कार्तिक - २००७च्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्य दिनेश कार्तिकचा भारतीय संघातील पुनरागमनाचा प्रवास प्रेरणादायी आहे. आयपीएल २०२२ त्याने ज्या पद्धतीने फिनिशरची भूमिका वटवली त्याने प्रभावीत होऊन त्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले. तो सध्या ३७ वर्षांचा आहे आणि दोन वर्षांपर्यंत तो असाच खेळत राहिल याची शक्यता कमी आहे. . इशान किशन व संजू सॅमसन त्याला रिप्लेस करू शकतात.