भारतीय कसोटी संघाचा प्रमुख फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) पुढीम हंगमात आता दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. शुक्रवारी दिल्ली आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन संघांत ट्रेड झाली आणि त्यानुसार दिल्लीनं अश्विनसाठी 1.5 कोटी रुपये मोजले आहेत आणि डावखुरा फिरकीपटू जगदीशा सुचिथ याला पंजाबला दिले आहे. 33 वर्षीय अश्विनला मागील लिलावात 7.6 कोटी मिळाले होते आणि त्याला दिल्लीकडून तितक्याच रकमेची अपेक्षा आहे.
याआधीच्या चर्चेनुसार अश्विनसाठी दिल्ली दोन खेळाडू पंजाबला देण्यास तयार होते. त्यात न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट याचे नाव होते, परंतु दिल्लीला पंजाबला केवळ सुचिथ द्यावा लागला. ''या डीलमुळे प्रत्येक जण आनंदी आहे. अश्विनला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,'' असे मत पंजाबचे सहमालक नेस वाडीया यांनी व्यक्त केले. दिल्ली कॅपिटल्सने मोठ्या थाटात अश्विनचे स्वागत केले आहे.