R Ashwin Virat Kohli, IND vs BAN 2nd Test: भारतीय संघाने बांगलादेश विरूद्धची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. वन डे मालिकेत अनपेक्षित २-१ असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर टीम इंडियाने हिशेब चुकता केला. पहिला कसोटी सामना भारताने जिंकलाच होता. दुसऱ्या सामन्यात शेवटच्या डावात भारताला १४५ धावांचे आव्हान मिळाले होते. भारताची अवस्था ७ बाद ७४ झाली होती. पण आर अश्विन आणि श्रेयस अय्यर जोडीने ७१ धावांची नाबाद भागीदारी करत संघाला सामना जिंकवून दिला. आर अश्विनने दुसऱ्या सामन्यात अष्टपैलू कामगिरी करून दाखवली. त्याने पहिल्या डावात ४ बळी टिपले तर दुसऱ्या डावात २ बळी टिपले. त्यासोबतच भारतीय फलंदाजीची घरसगुंडी झाल्यानंतर त्याने नाबाद ४२ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यासोबतच अश्विनने थेट विराट कोहलीच्या एका विक्रमाशी बरोबरी केली.
आर अश्विनने मीरपूर कसोटीत अष्टपैलू खेळ दाखवून विराट कोहलीची बरोबरी केली. अश्विनने कसोटीच्या पहिल्या डावात चार विकेट घेतल्या आणि १२ धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने चार विकेट्स घेतल्या आणि नाबाद ४२ धावा केल्या. त्याने अय्यरसोबत आठव्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली. त्यामुळे अश्विनची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. आर अश्विनच्या कसोटी कारकिर्दीतील ही नववी वेळ आहे, जेव्हा त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. या बाबतीत त्याने विराट कोहलीची बरोबरी केली. कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये नऊ वेळा सामनावीर म्हणून निवडण्यात आले आहे. सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच पुरस्कार पटकावणाऱ्या भारतीयांमध्ये हे दोघेही आता चौथ्या स्थानावर आहेत.
भारतासाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच जिंकण्याचा विक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने हा पराक्रम १४ वेळा केला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड. तो ११ वेळा सामनावीर ठरला आहे. तर माजी कर्णधार अनिल कुंबळे १० वेळा हा सन्मान पटकावत तिसऱ्या स्थानी आहे. अश्विन हा भारताच्या सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे, त्याच्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाज म्हणूनही मोठा विक्रम आहे. त्याने ८८ कसोटी सामने खेळले असून त्यात त्याच्या ३,०४३ धावा आहेत. एवढेच नाही तर त्याने १३ अर्धशतके आणि पाच शतके झळकली आहेत.