इंडियन प्रीमिअर लीग २०२४ साठी पुढील महिन्यात लिलाव होणार आहे. त्याआधी ट्रेडिंगमध्ये गुजरात टायटन्सकडून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला आपल्या ताफ्यात सामिल करून घेतले. आयपीएल २०२४च्या ट्रेडिंगमधील ही सर्वात मोठी डिल ठरली. कारण, हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने २०२२ मध्ये पहिल्याच प्रयत्नात जेतेपद पटकावले, तर २०२३मध्ये उपविजेते ठरले. तरीही हार्दिकने माजी फ्रँचायझीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हार्दिक व्यतिरिक्त चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सला रिलीज केले. सनरायझर्स हैदराबादने महागड्या हॅरी ब्रूकला, तर मुंबई इंडियन्सने जोफ्रा आर्चरला रिलीज केल्याने अधिक चर्चा रंगली. एकूण ८९ खेळाडू रिलीज केले गेले आणि मुंबई इंडियन्स व कोलकाता नाइट रायडर्स या दोन संघांची रिलीज यादी खूप मोठी ठरली.
दुसरीकडे पंजाब किंग्सने सर्वात कमी म्हणजेच ५ खेळाडूंना रिली केले. त्यामध्ये आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनमध्ये ९ कोटीची बोली लागलेल्या शाहरुख खानचे नाव असल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. गेम चेंजर म्हणून शाहरुख खानकडे पाहिले जात होते, परंतु त्याने २०२२ व २०२३च्या पर्वात एकही अर्धशतकावीना अनुक्रमे ११७ व १५६ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सविरुद्ध २३ चेंडूंत ४१ धावांची खेळी ही त्याची सर्वोत्तम ठरली आणि त्यातही त्याची टीम हरली.
पण, या निराशाजनक कामगिरीनंतरही भारतीय फिरकीपटू आर अश्विन याने शाहरुख खानवर तगडी बोली लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तामिळ नाडूच्या या अष्टपैलू खेळाडूसाठी गुजरात टायटन्स बोली लावू शकतात. हार्दिकची रिप्लेसमेंट म्हणून GT त्याचा विचार करू शकतात. ''शाहरुख खानसाठी चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात मी सरळसरळ चढाओढ पाहायला मिळेल. गुजरातने हार्दिकला जाऊ दिलं आणि त्यांना मॅच फिनिशर खेळाडू हवाय. शाहरुखसाठी पंजाबने ९ कोटी रुपये मोजले होते आणि त्याने त्याची पॉवर हिटींग दाखवली होती. त्यामुळे लिलावात त्याला १२-१३ कोटी सहज मिळतील,''असे अश्विन म्हणाला.
पाचवेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्सने ८ खेळाडूंना रिलीज केले. ज्यामध्ये अष्टपैलू बेन स्टोकोस, कायले जेमिन्सन यांच्यासह अंबाती रायुडूचा समावेश होता. त्यामुळे तेही शाहरुखला घेण्याचा प्रयत्न करतील. चेन्नईचा जर मिचेल स्टार्कला घेण्याचा प्रयत्न फसला, तर ते शाहरुखसाठी प्रयत्न नक्की करतील. त्यांच्याकडे सध्याच्या घडीला स्थानिक खेळाडू नाही,''असेही अश्विन म्हणाला.
Web Title: R Ashwin expects 'war' between CSK and GT for Shahrukh Khan; backs released India all-rounder to fetch ' ₹12-13 crore' at IPL auction
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.