लंडन - भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज आणि समालोचक संजय मांजरेकर हे त्यांच्या रोखठोक मतांमुळे अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडत असतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात आणि रवींद्र जडेजामध्ये सुरू असलेली शाब्दिक जुगलबंदी सर्वांच्या परिचयाची झालेली आहेत. त्यात आता मांजरेकरांनी भारताचा सध्याचा अव्वल फिरकीपटू रविचंद्रन अश्विनशी पंगा घेतला असून, अश्विननेही फिल्मी डायलॉगच्या माध्यमातून त्यांना चोख उत्तर दिले आहे.
संजय मांजरेकर यांनी हल्लीच ऑल टाइम ग्रेट प्लेयर्सची नावे सांगितली होती. त्यामध्ये त्यांनी अश्विनच्या नावाचा समावेश केला नव्हता. तसेच अश्विनच्या नावाचा समावेश न करण्यामागचे कारणही त्यांनी सांगितले होते. त्याला अश्विनने उत्तर दिले. अश्विनने ट्विटरवर एक मिम शेअर करत प्रतिक्रिया दिली. त्याने अपरिचित या तामिळ चित्रपटातील एक सीन शेअर केला. यामध्ये मुख्य पात्र असलेल्या अभिनेता त्याच्या मित्राला सांगतो की, असं करू नको माझ्या हृदयाला वेदना होतात.
ईएसपीएनक्रिकइन्फोचा कार्यक्रम रनऑर्डर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी आर. अश्विनचे कौतुक केले होते. अश्विन हा सध्याच्या काळातील सर्वश्रेष्ठ गोलंदाज असल्याचे म्हटले होते. मात्र मांजरेकर यांनी इयान चॅपेल यांच्या विधानाशी असहमती व्यक्त केली होती. मांजरेकर यांनी रविचंद्रन अश्विन यांनी परदेशी मैदानांवरील रेकॉर्डवर प्रश्न उपस्थित केले होते.
ते म्हणाले होते की, भारतीय मैदानांवर रवींद्र जडेजा आणि हल्लीच अक्षर पटेल यांच्यासारख्या फिरकीपटूंनीसुद्धा चांगली कामगिरी केली आहे. मांजरेकर म्हणाले की, अनेकजण अश्विनला सर्वकालीन महान गोलंदाज म्हणतात, यावर माझा आक्षेप आहे. अश्विनने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड या देशात त्याने एकदाही पाच बळी घेतलेले नाहीत. तसेच जेव्हा तुम्ही भारतीय खेळपट्ट्यांवरील त्याच्या दमकार कामगिरीबाबत विचार करता तेव्हा गेल्या चार वर्षांत जडेजाने जवळपास अश्विनएवढेच बळी घेतले आहेत. तसेच इंग्लंडविरुद्ध झालेल्या मागच्या कसोटी सामन्यात अक्षर पटेलने अश्विनपेक्षा अधिक बळी घेतले होते, असे मांजरेकर म्हणाले.