ब्रिस्बेन: रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीच्या वेळेवर माजी दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी टीका केली आहे. गावसकर म्हणाले की, 'हा स्टार फिरकीपटू ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका संपेपर्यंत वाट पाहू शकला असता. कारण, आता भारतीय संघाकडे पुढील दोन कसोटी सामन्यांसाठी एक सदस्य कमी झाला आहे.'
अश्विनने तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच चकीत केले. भारत-ऑस्ट्रेलिया पाच सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. गावसकर म्हणाले की, 'अश्विन हे सांगू शकला असता की, मालिका संपल्यानंतर मी भारतीय संघात निवडीसाठी उपलब्ध असणार नाही. याला काय अर्थ आहे. महेंद्रसिंह धोनीने ही याचप्रकारे २०१४-१५ च्या मालिकेदरम्यान तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर निवृत्ती जाहीर केली होती. यामुळे संघाचा एक सदस्य कमी होतो.'
गावसकर पुढे म्हणाले की, 'निवड समितीने कोणत्यातरी उद्देशानेच या दौऱ्यासाठी एवढ्या अधिक खेळाडूंची निवड केली आहे. जर कोणाला दुखापत झाली तर ते राखीव खेळाडूंमधून कोणाचीही निवड करू शकतात.' गावसकर यांना विचारण्यात आले की अश्विनची जागा घेण्यासाठी वॉशिंग्टन सुंदरला तयार केले जाऊ शकते का? यावर ते म्हणाले की, 'मला वाटते की वॉशिंग्टन त्याच्यापुढे आहे.'