रिषभ पंत कोणत्याही क्षणी सामना फिरवण्याची क्षमता राखून आहे. जर पंतने आक्रमकता आणि बचाव यांमध्ये योग्य ताळमेळ साधला, तर तो प्रत्येक सामन्यात शतक झळकवू शकतो,' असा विश्वास भारताचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने व्यक्त केला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंत बहुतांश वेळा रिस्क घेऊनच खेळतो त्यामुळे...
अश्विनने म्हटले की, 'पंतचे अनेक फटके धोकादायक असतात. यामुळे त्याला आपल्या क्षमतेचे योग्य विश्लेषण करता येत नाही. त्याला सांगावे लागेल की, जर खंबीर फलंदाजी करायची असेल किंवा एखाद्या लक्ष्याच्या निर्धाराने खेळायचे असेल, तर काय करावे लागेल. त्याने खूप साऱ्या धावा काढल्या नाहीत; पण असेही नाही की, त्याने धावाच काढल्या नाहीत. त्याच्याकडे आता खूप वेळ आहे.'
मुद्दा ताळमेळ राखण्याचा
अश्विनने पुढे म्हटले की, 'पंतला अद्याप आपल्या पूर्ण क्षमतेची जाणीव झालेली नाही. त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत; पण अडचण हीच आहे की, त्याच्याकडील सर्व फटके धोकादायक आहेत. जर त्याने आपल्या बचावावरही लक्ष दिले आणि २०० चेंडू खेळला, तर तो प्रत्येक सामन्यात मोठी खेळी करील. त्यामुळे मुख्य मुद्दा हा ताळमेळ राखण्याचा आहे. त्याला यासाठी मार्ग शोधावाच लागेल.'
तो माझ्या गोलंदाजीवर कधीच आउट झाला नाही
पंतने सिडनी कसोटीत विरुद्ध शैलीच्या दोन खेळी खेळल्या. त्याने पहिल्या डावात सावध पवित्रा घेत ४० धावा केल्या. या खेळीची फार चर्चा झाली नाही; पण दुसऱ्या डावात त्याने स्फोटक अर्धशतक झळकावले. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. प्रत्येकजण त्यावेळी त्याची पहिल्या डावातील खेळी विसरून गेला होता. एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की, पंत बचावात्मक पद्धतीने खेळताना क्वचितच बाद झाला असेल. त्याच्याकडे क्रिकेट विश्वातील सर्वोत्तम बचावात्मक तंत्र आहे. मी त्याला नेटमध्ये खूप गोलंदाजी केली असून, तो कधीच बाद झाला नाही. त्याच्या भक्कम बचावात्मक तंत्राविषयी त्याला सांगण्याचा मी नेहमी प्रयत्न केला, असेही अश्विनने म्हटले आहे.