मेलबोर्न : सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणे आणि प्रतिस्पर्धी संघाची तमा न बाळगता स्वतःचे कौशल्य उंचाविण्याची तळमळ या गोष्टी रविचंद्रन अश्विन याला इतरांच्या तुलनेत विशेष खेळाडू बनवितात, असे मत माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले आहे. ३८ वर्षांच्या अश्विनने ऑस्ट्रेलियात तिसऱ्या कसोटीनंतर अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
आयसीसी रिव्ह्यूमध्ये शास्त्री म्हणाले, 'अश्विनच्या ज्या गोष्टींनी मला सर्वाधिक प्रभावित केले, त्यापैकी सर्वांत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे स्वतःचे कौशल्य उंचाविण्याची त्याच्यात असलेली तळमळ. तो कधीही समाधानी दिसत नाही. गेल्या तीन वर्षांत त्याने स्वतःच्या गोलंदाजीतील कौशल्य चांगलेच उंचावले, नवे काही शिकण्यासाठी तो फारच मेहनत घेतो. वेळेनुसार स्वतःला अपडेट करतो. तो मॅचविनर असल्याची ग्वाही त्याचे ५३७ कसोटी बळी देतात. कसोटीत ५०० वर बळी घेणे विशेष आहे.'
२०११ ला वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या अश्विनने एकूण ७६५ गडी बाद केले. शास्त्री पुढे म्हणाले की, 'गेल्या पाच वर्षांत अश्विन-जडेजा ही उत्कृष्ट फिरकी जोडी बनली. दोघेही एकमेकांना पूरक ठरले. डाव्या आणि उजव्या फलंदाजांविरुद्ध अश्विनचा रेकॉर्ड एकसारखाच आहे. तो कुणाविरुद्ध गोलंदाजी करतो याचा अश्विनवर काहीही परिणाम होत नाही.'
अश्विनला 'खेलरत्न' द्या!
रविचंद्रन अश्विन याला प्रतिष्ठेचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी कन्याकुमारीचे काँग्रेस खासदार विजय वसंत यांनी केली आहे. वसंत यांनी क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांना टॅग करीत बुधवारी निवृत्त झालेला ऑफ स्पिनर अश्विन याला सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्याची विनंती केली. भारतीय क्रिकेटमधील अतुलनीय योगदान आणि मैदानावरील उल्लेखनीय कामगिरीमुळे अश्विन खरोखरच या सन्मानास पात्र आहे,' असे द्विट वसंत यांनी केले.