ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. या सामन्यासाठी आघाडीचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आलं नव्हतं. दरम्यान, या सामन्यानंतर रविचंद्रन अश्विनने प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने पराभवानंतरही संघाला पाठिंबा देताना २०२१ ते २३ या काळात केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा फटकावल्या होत्या. त्यानंतर भारताचा पहिला डाव २९६ धावांमध्ये आटोपला होता. पहिल्या डावात १७३ झालांची आघाडी घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव ८ बाद २७० धावांवर घोषित करत भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा दुसरा डाव अवघ्या २३४ धावांतच आटोपला. भारताचे शेवटचे ७ फलंदाज अवघ्या ७० धावांत गडगडले. त्यानंतर रविचंद्रन अश्विनने ट्विट करत ऑस्ट्रेलियन संघाचं अभिनंदन केलं. तसेच भारतीय संघाने केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं.
अश्विन म्हणाला की, सामन्याचा अशाप्रकारे शेवट होणं निराशाजनक आहे. तरीही दोन वर्षांपासून केलेले हे उत्तम प्रयत्न होते. या सामन्यासाठी अश्विनला संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्यामुळे भारतीय संघव्यवस्थापनावर टीका झाली होती. मात्र मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय संघामध्ये अश्विनला स्थान न देण्या्च्या निर्णयाचा बचाव केला होता. पावसामुळे आम्हाला चौथा वेगवान गोलंदाज खेळवणं भाग पडलं, असे द्रविडने सांगितले.
रविचंद्रन अश्विनने आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील दुसऱ्या सत्राच्या दोन वर्षांच्या काळात भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. त्याने १३ कसोटी सामन्यांमध्ये ६१ बळी टिपले होते. तर अश्विनने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ९२ कसोटी सामन्यांमध्ये ४७४ बळी टिपले आहेत. तसेच ३ हजार १२९ धावा फटकावल्या आहेत.