Sai Kishore Harpreet Brar, IPL 2024 Punjab Kings vs Gujarat Titans: सलामीची अर्धशतकी भागीदारी आणि शेवटच्या टप्प्यात हरप्रीत ब्रारने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सला १४३ धावांचे आव्हान दिले. नियमित कर्णधार शिखर धवन अजूनही फिट नसल्याने पंजाब किंग्जचा हंगामी कर्णधार सॅम करन याने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. पण सातत्याने विकेट्स गमावल्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. गुजरातच्या फिरकीपटूंपुढे पंजाबची गाडी रूळावरून घसरली. साई, राशिद आणि नूर या स्पिनर्सने मिळून एकूण ८ बळी घेतले.
धवनच्या अनुपस्थितीत सॅम करन आणि प्रभसिमरन सिंग सलामीला आले. या दोघांनी पॉवरप्ले मध्ये अर्धशतकी भागीदारी केली. पण प्रभसिमरनच्या विकेट नंतर पंजाब एक्सप्रेस रुळावरून घरसली. संघाच्या ५२च्या धावसंख्येवर प्रभसिमरन (३५) बाद झाला. पाठोपाठ सॅम करनदेखील २० धावांवर तंबूत परतला. त्यानंतर रॅली रुसो (९), जितेश शर्मा (१३), लियम लिव्हिंगस्टोन (६), शशांक सिंग (८), आशुतोष शर्मा (३) सर्वच फलंदाजांनी पंजाबच्या चाहत्यांची पूर्णपणे निराशा केली. हरप्रीत ब्रारने १२ चेंडूत २९ धावा केल्या. त्यामुळेच पंजाबला १४२ धावांपर्यंत मजल आली.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिलने मात्र अप्रतिम कॅप्टन्सी करत, गोलंदाजीत बदल केले. साई किशोरने ३३ धावांत ४, नूरने २० धावांत २, मोहीत शर्माने ३२ धावांत २, राशिदने १५ धावांत १ बळी टिपले.