विश्वचषक २०२३ मधील अत्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात न्यूझिलंडचा केवळ ५ धावांनी पराभव झाला. मात्र, संघाने ज्या पद्धतीने लढत दिली, ते पाहता क्रिकेट चाहत्यांकडून टीम न्यूझिलंडचं कौतुक होत आहे. प्रथम फलंदाजी करताना ३८८ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर न्यूझीलंडकडून तगडं प्रत्युत्तर मिळेल असा अंदाज ऑस्ट्रेलियालाही आला नसावा. मात्र, रचिन रविंद्र ( Rachin Ravindra ) याच्या शतकाने कांगारूंना भांबावून सोडले. त्याने ७७ चेंडूंत शतक झळकावले आणि सचिन तेंडुलकरनंतर मोठा पराक्रम करणारा जगातल्या पहिल्याच फलंदाजाचा मान पटकावला. त्यामुळे, रचिन रविंद्र सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतोय. तर, या खेळाडूच्या वेगळ्याच नावाची रंजक कहानीही समोर आली आहे. धर्मशालाच्या क्रिकेट मैदानावर रच्चिन, रच्चिन.. या घोषणांनी पुन्हा एकदा सचिनची आठवण करुन दिली.
धर्मशालाच्या मैदानावर रचिन रचिन नावाचा जयघोष पाहायला मिळाला. पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर सच्चिन.. सच्चिन.. भास व्हावा असा माहोल धर्मशाला स्टेडियमवर होता. भारतीय चाहत्यांना रचिनची तुफानी खेळी पाहून सचिनची आठवण झाली अन् मैदानावर रच्चिन.. रच्चिन... अशी नारेबाजी ऐकायला मिळाली. अर्थातच, रचिनच्या नावाचंही सचिनशी कनेक्शन आहे. रचिनच्या नावाची कथा टीम इंडियाचा द वॉल राहुल द्रविड आणि मास्टरब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरशी जोडलेली आहे.
रचिनचा जन्म १८ नोव्हेंबर १९९९ साली न्यूझिलंडच्या वेलिंगटन शहरात झाला. त्याचे वडिल रवि कृष्णमूर्ती हे सॉफ्टवेयर इंजिनिअर आहेत, त्याचं कर्नाटकची राजधानी बंगळुरूशी नातं आहे. सन १९९० साली ते बंगळुरूमधून न्युझिलंडला शिफ्ट झाले. क्रिकेट विश्वात रचिनने कमी वयातच आपलं टॅलेंट दाखवलं अन् तो अंडर १९ च्या टीम न्यूझिंलमध्ये सहभागी झाला. न्यूझिलंडच्या घरगुती मैदानात अफलातून कामगिरी केल्यानंतर त्याला न्यूझिलंडच्या संघात स्थान मिळालं. रचिनचे वडिल राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलरचे मोठे फॅन आहेत. त्यामुळेच, त्यांनी राहुलमधून RA हे एक आणि सचिन मधून CHIN हे दोन अक्षर घेऊन मुलाचं नाव रचिन ठेवलं. अर्थातच, रचिन हा न्यूझिलंडकडून खेळणारा मूळ भारतीय वंशाचा तडाखेबंद फलंदाज आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने झळाकवलेल्या शतकानंतर तो सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. विशेष म्हणजे ज्याच्या प्रेरणेतून त्याचं नाव रचिन ठेवण्यात आलं, त्या सचिननं रेकॉर्डही रचिनने मोडलं.
सचिननंतर दुसराच फलंदाज
२६ वर्षांच्या आत वर्ल्ड कप स्पर्धेत दोन शतक झळकावणारा रचिन रवींद्र हा दुसरा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरने आधी हा पराक्रम केला होता. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कपच्या एकाच पर्वात दोन शतक झळकावणारा रचिन हा चौथा फलंदाज ठरला. यापूर्वी ग्लेन टर्नर ( १९७५), मार्टीन गुप्तिल ( २०१५), केन विलियम्सन ( २०१९) यांनी हा पराक्रम केला आहे. न्यूझीलंडकडून वर्ल्ड कप स्पर्धेत शतक झळकावणारा तो युवा फलंदाज ठरला आहे. त्याने २३ वर्ष व ३२१ दिवसांचा असताना आधी इंग्लंडविरुद्ध आणि आज २३ वर्ष व ३४४ दिवसांचा असताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकले.